no images were found
साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमींनी वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे :जिल्हाधिकारी
कोल्हापूर : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्यासाठी येथील जिल्हा मराठी भाषा समितीच्यावतीने शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास माजी आय.ए.एस. अधिकारी, मराठी साहित्यिक, 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे ‘वाचन का व कसे करावे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील व जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर उपस्थित राहणार आहेत.