
no images were found
कोल्हापुरवासियांचा खंडपीठ हा जिव्हाळ्याचा प्रश्न – पालकमंत्री, प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, (प्रतिनिधी):: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह पक्षकार, सेवाभावी संस्था, संघटना गेले कित्येक वर्षे आंदोलन करीत आहेत. कोल्हापुरवासियांचा खंडपीठ हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याबाबत शासन सकारात्मक असून जिल्ह्यातील प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर बैठक घेणार आहेत. शासनाच्या वतीने त्यांनी दसरा चौकात उपोषण स्थळी भेट देवून माणिक पाटील चुयेकर यांना उपोषण सोडण्यास सांगितलं. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्याहस्ते सरबत पिवून उपोषण सोडले. माणिक पाटील चुयेकर हे गेले नऊ दिवस कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते.
यावेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी जिल्ह्यात खंडपीठ व्हावे म्हणून माझ्यासह, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असून शासन यासाठी अतिशय सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत खंडपीठापबाबत स्थापनेसाठी सकारात्मक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दसरा चौक उपोषण स्थळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह खंडपीठ कृती समिती सदस्य आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.