
no images were found
कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनसाठी चांगले नियोजन करा- पालकमंत्री
कोल्हापूर, : राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने राज्यात राष्ट्रीयस्तरावर पुरुष व महिलांसाठी कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. यावेळी ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी २०१७ साली ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यात पार पडली होती. तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून रु.५०.०० लक्ष ऐवजी रु.७५.०० लक्ष अशी वाढ मागील वर्षी करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनसाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार राहुल आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कार्तिकेयन एस., क्रीडा व युवक सेवा उप संचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेमधील सहभागी होणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या दृष्टीकोनातून, ही स्पर्धा चांगली व शासन निर्णयातील नियमावली नुसार आयोजित करावी. या स्पर्धेमध्ये पुरुषगट १२ संघ, महिलागट १२ संघ व सबज्युनिअर (किशोर) गट मुले ८ संघ, सबज्युनिअर (किशोर) गट मुली ८ संघ असे एकूण ४० संघ महाराष्ट्र राज्यातून सहभागी होतात. सोबतचा सर्व स्टाफ मिळून हजारो लोकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात यावी असेही पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. ही स्पर्धा मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी मंजूर शासनाचा निधी वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून राज्य स्तरावर आवश्यक पाठपुरावा करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आमदार राहुल आवाडे यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजनासाठी शासन निधीव्यतिरिक्त इतर निधी लागल्यास आमदार निधीतून तसेच सामाजिक संस्थांकडून घेवू असे सांगितले. या बैठकीत कोल्हापूर खो-खो असोशिएशन आणि आमदार राहुल आवाडे यांनी सुचविल्यानुसार इचलकरंजी येथे स्पर्धा घेण्याचे ठरले. या पाच दिवसांच्या कालावधीत सहभागींची निवास व्यवस्था, भोजन, वैद्यकीय सुविधा, पोलिस बंदोबस्त, प्रेक्षक गॅलरी, स्टेज, ग्राउंड, माईक आदी व्यवस्था चांगल्या प्रकारे करा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.