
no images were found
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताह
कोल्हापूर,(प्रतिनिधी): -शिवाजी विद्यापीठात दि. २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी करण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉक्टर कैलास सोनवणे यांनी दिली आहे.
डॉ. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विज्ञान दिनाची यावर्षीची संकल्पना भारतीय तरुणांना नवकल्पना आणि विज्ञानामध्ये सक्षम बनवणे अशी आहे. भारतातील तरुणांना विज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी आणि नवोन्मेषासाठी प्रोत्साहित करणे असा हेतू त्यामागे आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पोस्टर मॉडेल, व्हिडिओ बनवणे, चित्रकला आणि लोकप्रिय व्याख्याने तसेच विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांसाठी रू. 80,000 अनुदान देण्यात आले आहे. उद्या सकाळी या समारंभाचे उद्घाटन प्र- कुलगुरू प्रा. प्रमोद पाटील यांच्या हस्ते आणि समन्वयक प्रा.गरडकर यांच्या उपस्थितीत होईल.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, अशोक गिरी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांचे उद्या (दि. 24) व्याख्यान होणार असून, 25 फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र विभागात व्हिडीओ मेकिंग स्पर्धा होईल. याचं दिवशी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे विज्ञान आणि नवोपक्रमातील नेतृत्वाचे नियम या विषयावर संबोधित करतील. तसेच प्रा. विजय खरे, माजी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे विज्ञान आणि नवोपक्रम तसेच प्रो-इनोव्हेशनमधील धोरणात्मक धोरण या विषयावर व्याख्यान देतील. २७ फेब्रुवारी रोजी प्राध्यापक आर.एस.पंडित आणि प्रा मिलिंद निकाळजे यांची विविध विषयांवर व्याख्याने होतील. प्रा.जी.एस . राशीनकर, प्रा.डी.एच. दगडे, प्रा.एस.पी. हंगीरगेकर, प्रा.संदीप संकपाळ, डॉ.राहुल माने हे राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.