
no images were found
दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
कोल्हापूर, : समाज कल्याण विभागाने आयोजित केलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा म्हणजे दिव्यांगांना कौशल्य सादर करण्याची चांगली संधी आहे. त्यांच्यात असलेले कला गुण, कौशल्य याठिकाणी निश्चितच सादर होतील असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे मांडले. त्यांच्याहस्ते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आयोजित जिल्ह्यातील सर्व प्रवर्गांच्या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी दिव्यांगांना सर्वच बाबतीत सहकार्य करुन त्यांचे येत्या काळात स्नेहसंमेलन घेवू, असे आश्वासनही दिले. या स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंड येथे संपन्न झाल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांचेसह शिक्षक शिक्षिका, पालक उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शानदार संचलन करुन सलामी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिव्यांगांना स्पर्धेबाबत शुभेच्छा दिल्या. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारामध्ये सर्वतोपरी झोकून द्यावे, आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा असे सांगुन सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी श्री.अडसूळ यांनी दिव्यांगांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन अशा स्पर्धांमधील यशानंतर निश्चितच बदलेल, असे सांगून प्रत्येक दिव्यांगामध्ये एकतरी विशेष कौशल्य निसर्गाने दिलेलेच असते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिव्यांगासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन दिव्यांगांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर तर्फे दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात असे सांगुन सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 18 दिव्यांग शाळेतील 265 विद्यार्थी व 215 शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती सांगितली व दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचे महत्व सांगितले. या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व सहभागी घटकांचे त्यांनी आभार मानले.