
no images were found
व्यवसायात यशासाठी ‘मर किंवा मार’ हा निर्धार गरजेचा : डॉ धनंजय दातार
कोल्हापूर, : आज प्रत्येक क्षेत्राप्रमाणे व्यवसायातही तीव्र स्पर्धा आहे. व्यवसायात प्रवेश करणे सोपे असले तरी टिकून राहणे अवघड असते. व्यवसाय हा विरंगुळ्यासाठी किंवा दानधर्मासाठी करायची गोष्ट नसून त्यात नफा हे एकमेव ध्येय समोर ठेवावे लागते. त्यामुळे व्यवसायात यश मिळवायचे असेल तर नवउद्योजकांनी कामाची लाज न बाळगता मेहनत करावी आणि ‘मर किंवा मार’ (डाय ऑर किल) अशा निर्धारानेच पाय रोवून उभे राहावे, असा सल्ला दुबई स्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नवउद्योजकांना दिला.
‘आकार डिजी ९’ न्यूज चॅनलतर्फे आयोजित आणि ‘ट्रायझॉन कॉर्पोरेट सर्व्हिसेस’ तर्फे प्रस्तुत ‘दुबई बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते. दुबईतील इंडिया क्लबच्या उत्सव हॉलमध्ये हा कार्यक्रम नुकताच झाला. मराठी उद्योजकांना दुबईत व्यवसाय करण्याची संधी मिळावी व बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने आकार ‘डिजी ९’चे संस्थापक प्रभाकर सूर्यवंशी यांनी या बिझनेस टूरचे आयोजन केले होते. दुबईतील प्रथितयश मराठी उद्योजकांशी त्यांनी या कार्यक्रमात संवाद साधला.
धनंजय दातार म्हणाले, मी ४० वर्षांपूर्वी दुबईत आलो त्यावेळी जी स्पर्धा होती त्याहून अधिक प्रचंड स्पर्धा सध्या आहे. जगभरातून अनेक उद्योजक या करमुक्त बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत. अशावेळी आपले अस्तित्व राखायचे असेल तर दुसऱ्यावर मात करावीच लागते. व्यवसाय हा फक्त नफ्यासाठीच करायचा असतो. नफ्याचे मार्जिन कमी ठेऊनही आपण स्पर्धेत तग धरु शकतो. मात्र झटपट नफ्याच्या आशेने आलेल्यांना उतावीळपणाने काही मिळत नाही.”
दुबईसारख्या बाजारपेठेत व्यवसायात टिकून राहण्यासाठी संयम लागतोच, परंतु येथील कायद्यांचे काटेकोर पालनही करावे लागते, असे सांगून ते म्हणाले, की नवजात अर्भक जसे तीन वर्षांनी चालायला, बोलायला व स्वतःहून खायला लागते तसेच कोणताही नवा व्यवसाय किमान १००० दिवस चिकाटीने चालवला तरच तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. मराठी तरुणांनी बदलत्या काळात स्वतःची पारंपरिक बुजरी आणि संकोची वृत्ती सोडून देऊन धाडसाने आपला व्यवसाय जागतिक बाजारपेठांत पोचवला पाहिजे. गुणवत्तापूर्ण उत्पादने व अभिनव सेवा स्पर्धात्मक किंमतीत देऊ केल्यास ते हमखास यशस्वी होतील.”