
no images were found
लव आणि कुशचे अयोध्येकडे प्रस्थान
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची दिव्य कथा विशद केली आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी एक भावुक करणारा क्षण अनुभवला, जेव्हा श्रीराम नकळत लव-कुश (शौर्य मंडोरिया आणि अथर्व शर्मा) या आपल्या दोन जुळ्या मुलांच्या विरोधात युद्ध करण्यास सज्ज झाले. हे युद्ध संपल्यानंतर लव-कुशने ज्या राजाशी युद्ध केले तो राजा म्हणजे श्रीराम आहे असे जेव्हा सीतेला समजते तेव्हा तिला धक्काच बसतो.
सीता लव कुशला आजवर तिने मनाशी जपलेले गुपित सांगते की, त्या दोघांनी ज्याच्याशी युद्ध केले, तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा जन्मदाता आहे आणि ते दोघे जिचा शोध घेत आहेत, ती सीता त्यांची माता आहे. वाल्मिकी ऋषी लव आणि कुशला समजावतात की श्रीराम आणि सीतेला पुन्हा एकत्र आणण्यासाठी युद्ध हा उपाय नाही. ते या दोन कुमारांना सांगतात की, त्यांनी अयोध्येस जाऊन तेथील लोकांच्या मनातील सीतेविषयीचा गैरसमज दूर करावा आणि तिला सन्मानाने परत राज्यात आणावे. त्यामुळे राम आणि सीता यांचे पुनर्मीलन करण्याच्या ध्येयाने लव आणि कुश अयोध्येकडे प्रस्थान करतात. पण, सहस्रमुख रावण (प्रणीत भट्ट) हे घडू देईल का?
सगळ्या संकटांवर मात करून लव आणि कुश राम आणि सीतेचे पुनर्मीलन घडवून आणणार का?
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते, “लव आणि कुशच्या प्रवासातून श्रीराम आणि सीता यांचे पुनर्मीलन घडवून आणण्याबाबतची आणि सीतेला आदर आणि सन्मान मिळवून देण्याची तसेच स्त्रीचा सन्मान करणारा समाज घडवण्याची त्यांची वचनबद्धता स्पष्ट दिसून येते. रामायणातील हा महत्त्वाचा अध्याय पडद्यावर जिवंत करताना धन्यता वाटत आहे. मला आशा आहे, हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल.”