
no images were found
बेट परिसरात दिवसा बिबट्यांच्या कळपाचे दर्शन; नागरिकांमध्ये दहशत
शिरूर- तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून पूर्वी एकटा फिरणारे बिबट्यांचे आता दिवसा सामूहिक दर्शन होत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनामुळे पशुधन धोक्यात आले असतानाच बिबट्या आता माणसावर जीवघेणा हल्ला करू लागला आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी शेतात बिनधास्त फिरणाऱ्या शेतकऱ्यांना आता बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी सोडाच, परंतु दिवसा शेतात फेरफटका मारणे मुश्किल झाल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
बिबट्याकडून जीवघेण्या हल्ल्याच्या घटना जांबूत आणि पिंपरखेड येथे घडल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत वाढली आहे. बेट भागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी व घोडनदीच्या मुबलक पाण्यामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर, टाकळीहाजी, कवठे येमाई, सविंदणे या बेट भागातील गावात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
या उसाच्या लपणचा फायदा उठवत गेले बारा वर्षांपासून या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, गाय, वासरू, घोडी, कुत्रा या प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहे. बिबट्याच्या वारंवार हल्ल्याच्या घटनेने आता अनेक शेतकरी कुत्रा पाळायचे बंद झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्या झाल्याने घटना घडूनही वेळेत पंचनामे होत नाहीत. वनविभागाकडूनही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्ल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.