
no images were found
‘उमेद अभियान’मुळे सामान्य महिलेचं उद्योजिका बनण्याचा स्वप्न पूर्ण होणार
‘उमेद अभियान व एसबीआय फाऊंडेशन’मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना मिळणार बळ. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहायता समुहातील महिला उद्योजकांसाठी येतोय नवा कोरा टी व्ही शो ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ दिनांक १३ डिसेंबर २०२४, संध्या. ४.१५ वा टीव्ही 9 या लोकप्रिय चॅनेलवर. स्त्रियांचं आयुष्य म्हंटल तर संसार, चूल, मूल यांसारख्या असंख्य गोष्टी सांभाळण्यात जातं पण सध्याच्या बदलत्या काळात स्त्री संसार सांभाळून स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहिलेली पाहायला मिळत आहे. ही अगदीच कौतुकाची बाब आहे पण तरीही स्त्रीला प्रोत्सहन, योग्य मार्गदर्शन मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी ‘उमेद अभियान’ स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी घेऊन येत आहे ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ हा नवा कोरा कार्यक्रम.
अनेकदा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्सहन दिलं जातं पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कर्यक्रमातून तब्बल ७० लाख महिलांना प्रेरणा मिळणार आहे. ‘उमेद अभियानने’ या अनोख्या कार्यक्रमासाठी ३९ महिलांची निवड केली आहे. या महिलांची यशोगाथा ऐकून इतर महिला प्रोत्सहीत होतील व त्यांनाही त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मिळेल. महाराष्ट्रातील उद्द्योजिका अनघा घैसास व उद्योजक विशाल सोलासकर आणि राहुल पापल यांचं मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. यामध्ये महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणार भांडवल, निधी हे एसबीआय फाऊंडेशनतर्फे मिळणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एसबीआय फौन्डेशन ने घेतल्यामुळे नाविन्यपूर्ण शो महाराष्ट्राला आणि देशाला अनुभवायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. ‘घे भरारी’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना रुचेश म्हणाले,”प्रत्येक ग्रामीण महिलेले तिची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल ७० लाख महिलांपर्यंत पोहचण्याच ध्येय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला उद्योजिका बनली पाहिजे. बदलत्या काळानुसार महिलांनी आणखी पुढे यायला हवं आणि त्यासाठीच ‘उमीद अभियान’ हे अभियान राबवत आहेत. या कार्यक्रमाचा परिणाम हा राज्याच्या ग्रामीण अर्थशास्त्राचा पाया मजबूत करण्यासाठी होणार आहे. अनेक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा या कार्यक्रमातून मिळणार आहे.”
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे. या कार्यक्रमाबद्दलच श्रेया म्हणते,”स्त्रियांना प्रत्येक कठीण प्रसंगातून जावं लागत. मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, प्रोत्सहन मिळत नाही. पण ‘उमेद अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. या कार्यक्रमातून ३९ महिलांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे हा अनुभव मला प्रत्यक्ष त्या स्त्रियांसह संवाद साधून अनुभवता येणार आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खचून जाणारा क्षण येतोच पण आता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी उमेद मिळेल. आता स्त्री फक्त चूल, मूल सांभाळणारी नसेल तर ती एक उद्योजिका ही असेल. ‘उमेद अभियान’ चं खूप कौतुक वाटतं आणि या अभियानाचा मला एक भाग होता येतंय या गोष्टीचा आनंद आहे. ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ या कार्यक्रमाद्वारे स्वबळावर उभ्या राहिलेल्या ३९ महिलांशी संवाद साधण्यास व त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.