Home राजकीय बांगलादेश निर्मितीने नव्या भू-राजकारणाची सुरवात: डॉ. यशवंतराव थोरात

बांगलादेश निर्मितीने नव्या भू-राजकारणाची सुरवात: डॉ. यशवंतराव थोरात

9 second read
0
0
33

no images were found

बांगलादेश निर्मितीने नव्या भू-राजकारणाची सुरवात: डॉ. यशवंतराव थोरात

 

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- पाकिस्तानशी १९७१चे युद्ध भारताने जिंकले आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. ही युद्धाची अखेर होती, मात्र उपखंडातील एका नव्या भू-राजकारणाची सुरवात होती. हे राजकारण आजतागायत सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आज ‘भारत-बांगलादेश संबंध’ या विषयावर डॉ. थोरात यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार होते, तर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र भणगे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. थोरात यांनी सुरवातीला १९७१च्या युद्धाशी संबंधित चित्रफीत दाखवून त्यानंतर आपल्या मांडणीस प्रारंभ केला. सुमारे दीड तासाच्या या व्याख्यानामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तान तसेच भारत आणि नवनिर्मिती बांगलादेश यांच्यामधील संबंध आणि त्या संबंधांवरील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव त्याचप्रमाणे दक्षिण आशियातील या घडामोडींचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेला परिणाम यांचा सर्वसमावेशक वेध घेतला. ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये झालेल्या १९७०च्या सार्वत्रिक निवडणुकीत झुल्फीकार अली भुट्टो यांना पराभूत करीत पूर्व पाकिस्तानच्या शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने मोठा विजय मिळविला. बांगला नागरिकांचा हा विजय पाकिस्तानला रुचणारा नव्हता. त्यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी नाकारण्यात आली. पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्चलाईट राबवित तेथील नागरिकांचे नृशंस हत्याकांड आरंभले, महिलांवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्या. लाखोंच्या संख्येने पिडित निर्वासितांचे लोंढे भारतात दाखल होऊ लागले. एकीकडे अन्नधान्याच्या टंचाईला सामोरे जात असलेल्या भारतासमोर ही मोठीच समस्या होती. तरीही या नागरिकांना अन्न, आसरा, वैद्यकीय मदत आदी दिली. मात्र यामुळे भारतावर विचार करण्याची वेळ आली. त्यातून ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या १२ विमानतळांवर हल्ला केला. ही संधी साधून पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिकाराच्या पवित्र्यात गेल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अवघ्या तेरा दिवसांत पूर्व पाकिस्तानचा पाडाव केला आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानच्या सैन्याने आत्मसमर्पण केले. जगाच्या इतिहासातील ही पहिली आणि एकमेव सार्वजनिक शरणागतीची घटना ठरली.

यानंतर जगभरातील भू-राजकीय परिस्थितीचाही डॉ. थोरात यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, चीन आणि रशिया यांच्या संबंधांमध्ये १९५० पासूनच दुरावा येण्यास सुरवात झाली होती. त्यातून चीन अमेरिकेच्या अधिक जवळ सरकण्याच्या प्रयत्नात होता. त्याचप्रमाणे नेहरूंच्या तिसऱ्या जगाच्या नेतृत्वाचे स्थान मिळविण्याचे स्वप्नही चीन पाहात होता. त्याचवेळी अमेरिका साम्यवादाला विरोध करीत भांडवलदारी व्यवस्थेला बळ देत होता. बाजारकेंद्री धोरणे आखत होता. मित्र राष्ट्रांची संख्या वाढवा, त्यांच्या वाटेला जाणाऱ्यांना संपवा, अशा भूमिकेत शिरली होती. रशियन राष्ट्रसंघाने भारताशी थेट हातमिळवणी केली होती. आधुनिक शस्त्रास्त्रे, लष्करी सामग्री पुरवित होता. संयुक्त राष्ट्रसंघ मात्र केवळ अन्नधान्य, वैद्यकीय मदत पुरवित आपली केवळ चर्चासंघ ही आपली ओळख बळकट करीत होता. या समग्र पार्श्वभूमीवर बांगलादेशचा पराभव पचवू न शकलेला पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीच्या मागे लागला. गवत खाऊ, पण अणूबाँब बनवू, अशी गर्जना भुट्टो करीत होते. यापुढे यदाकदाचित पाकिस्तान युद्धखोरीवर उतरलाच, तर ते चीनच्या पाठबळावरच असेल, हे अगदी स्वच्छ आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात श्रीराम पवार म्हणाले, भू-राजकारण हे केवळ युद्धापुरते मर्यादित नसते, तर कायमपणे, सातत्याने जगात उलथापालथ घालत असते. मोठे देश जेव्हा आपले भू-राजकारण खेळत असतात, तेव्हा छोटे देश आपले भू-राजकारण पुढे रेटत ते साधून घेण्याच्या मागे असतात. त्यात यशस्वीही होतात, असा जागतिक इतिहास आहे. याचे बांगलादेश हे उत्तम उदाहरण आहे. माणसाला धर्मापलिकडेही अनेक गोष्टी हव्या असतात. केवळ सैन्यबळावर कोणताही भूभाग ताब्यात ठेवता येऊ शकत नाही, याचीही जगाच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. कोणताही नेता हा पूर्णांशाने धर्मनिरपेक्ष नसतो, तर आपले भू-राजकारण साध्य करून घेण्यासाठी धर्मजाणिवांचा जितका लाभ घेता येईल, तितका घेत असतो. त्यामधील आक्रमकतेमध्ये कमी-अधिकपणा असू शकतो, हे समजून घ्यायला हवे.

राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर मतीन शेख यांनी आभार मानले. यावेळी बाळ पाटणकर, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता बोडके, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. अश्विनी साळुंखे, डॉ. ऋषीकेश दळवी, दिलीप पवार, शिक्षक, संशोधक विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …