
no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत काम करणारी करुणा पांडे बोलत आहे प्रेम आणि धैर्याच्या कायापालट करण्याच्या ताकदीबद्दल
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेचे हृदयस्पर्शी कथानक आणि जीवनातील आव्हानांना धडाडीने तोंड देऊन हिंमतीने जगणारी यातील नायिका पुष्पा (करुणा पांडे) यांनी प्रेक्षकांचे मन काबिज केले आहे. आगामी भागांमध्ये, पुष्पासमोर एक मोठे आव्हान उभे राहणार आहे. रवी (अमित कैलास शिवडे अभिनीत च्युइंग गम), बद्रीनाथ (नयन भटनागर अभिनीत स्टेपलर) आणि सौरभ (हितुल पुजारा अभिनीत बादशाह) या तीन अल्पवयीन गुन्हेगारांना बाल सुधार गृहात न पाठवता सुधारण्याची जबाबदारी तिच्यावर येणार आहे.
सुरुवातीला कचरलेली पुष्पा शेवटी ही जबाबदारी स्वीकारण्याचे बळ गोळा करते. तिचा ठाम विश्वास आहे की प्रेम आणि मार्गदर्शन यांच्यात जीवन पालटून टाकण्याची क्षमता असते. मार्ग सोपा नाही, बापोद्रा चाळीतल्या रहिवाशांचा विरोध तिला पत्करावा लागणार आहे, इतकेच काय, तिच्या या निर्णयावर तिच्या घरचे लोकही सवाल उभा करणार आहेत.
या मुलांना सुधारण्यासाठी कटिबद्ध पुष्पा खुल्या दिलाने हे आव्हान स्वीकारते. त्यांना चांगल्या सवयी लावते, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देते आणि त्यांच्यातील छुप्या प्रतिभेची ओळख त्यांना करून देते. पण मुलांच्या लहरी वागण्याने– चोऱ्यामाऱ्या, मारामारी आणि तिचा अंत पाहणे- पुष्पा जेरीस येते. स्टेपलरचा राग अनावर होतो तेव्हा चाळीत गोंधळ माजतो. परिस्थिती पार विकोपाला जाते.
पुष्पाच्या कुटुंबाचा आधार डळमळीत होतो आणि समाज तिच्याविरुद्ध उभा राहतो, त्यावेळी इतरांसाठी मनात असलेली करुणा कोणत्याही गोंधळावर मात करू शकते हे दाखवून देणे पुष्पासाठी गरजेचे होते. तिला ही वेळ सावरता येईल का आणि हृदय परिवर्तन शक्य असते, हे सिद्ध करता येईल का?
पुष्पाची भूमिका करत असलेली करुणा पांडे म्हणते, “प्रेक्षक भावनांचा रोलरकोस्टर अनुभवणार आहेत, कारण पुष्पा तर नेहमीच धाडसाने पुढचे पाऊल टाकण्यास सज्ज असते. प्रत्येक आव्हानाला ती निडरपणे तोंड देते, मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. आयुष्याने तिच्यासमोर नवीन अडचणी उभ्या केल्या आहेत, ज्यांच्यामुळे तिच्या जीवनात उलथापालथ होऊ शकते. पण मी माझ्या या विश्वासावर ठाम राहते की, प्रेम आणि धैर्याने आपण लोकांच्या हृदयाला हात घालू शकतो आणि त्यांच्यातील सद्गुण वर आणण्यासाठी त्यांना प्रेरित करू शकतो.”