
no images were found
लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मुंबई :‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने मतांच्या रूपात जे भरभरून प्रेम दिले त्याचा प्रचंड दबाव या सरकारवर असून, तो मला जाणवत आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय धक्के या राज्यात पाहायला मिळाले. परंतु, आम्ही बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करू. गेल्या अडीच वर्षांतील विकासकामांची गती आता राज्याला प्रगतीकडे घेऊन जाईल. मंत्रिमंडळात आमच्या जबाबदाऱ्या बदलल्या असल्या तरी प्रगतीची दिशा कायम राहील, ’ अशी ग्वाही नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले. ‘आगामी काळात सुडाचे राजकारण चालणार नाही. शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे अशा प्रमुख नेत्यांना मी फोन करून निमंत्रण दिले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्ववत व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढील पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही ते म्हणाले. आगामी हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून, मागील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे मूल्यमापन करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. ज्यांची कामगिरी चांगली आहे आणि प्रादेशिक समतोल राखताना त्यांची गरज असेल तर त्यांना कायम ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.