Home शैक्षणिक लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच संविधान यशस्वी: डॉ. अशोक चौसाळकर

लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच संविधान यशस्वी: डॉ. अशोक चौसाळकर

15 second read
0
0
48

no images were found

लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच संविधान यशस्वी: डॉ. अशोक चौसाळकर

 

कोल्हापूर(प्रतिनिधी): संविधान ही भारतीय लोकांनी आपल्या जीवनाची प्रेरणाशक्ती मानली. हे संविधान लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच गेली ७५ वर्षे यशस्वीपणे टिकले आणि यापुढेही टिकेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहामध्ये ‘भारतीय संविधानाचे आजच्या भारतासाठीचे महत्त्व’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार होते.

डॉ. चौसाळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भारतीय संविधानाची प्रस्तुतता अत्यंत मुद्देसूदरित्या मांडली. ते म्हणाले, संविधानातील विचार हे देशातील जनतेला मान्य असल्यानेच त्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला, हे लक्षात घेतले पाहिजे. संविधानाचे तत्त्वज्ञान हे सामाजिक, आर्थिक व राजकीय चळवळींतून साकार झाले आहे. लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान अभिव्यक्त झाले. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सामाजिक चळवळींचे तत्त्वज्ञान आकारास आले. या साऱ्या चळवळींचे तत्त्वज्ञान संविधानामध्ये ग्रथित झाल्याचे दिसते. मार्गदर्शक तत्त्वांमधील अनेक तरतुदी या देशाच्या गेल्या दीडशे वर्षांच्या सुधारणांची परंपरा सांगणाऱ्या आहेत. संविधानातील या प्रेरक तत्त्वांद्वारेच भारतीय जनता प्रगती करते आहे.

समतेचा अधिकार, जगण्याचा अधिकार आणि अभिव्यक्तीचा अधिकार हा राज्यघटनेने भारतीयांना प्रदान केलेला सुवर्ण त्रिकोण असल्याचे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, राज्यघटनेने लोकांना अनेक अधिकार दिलेले आहेत. तथापि, ते अधिकार लक्षात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थेला भाग पाडणे महत्त्वाचे असते. संघर्ष, चळवळींशिवाय आणि मागण्या मांडल्याखेरीज अधिकार प्राप्त होत नाहीत, हे गेल्या ७५ वर्षांच्या संवैधानिक वाटचालीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जीवनात राज्यघटनेचे महत्त्व आहेच, पण जेव्हा लोक आपले अधिकार शाबीत करून घेतात, तेव्हा ते सिद्ध होते. न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार हा लोकशाहीतला सर्वात मोठा अधिकार संविधानाने आपल्याला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक क्रांतीच्या वाटचालीत राज्यघटना विकसित होत जाते. मार्गदर्शक तत्त्वांच्या साथीने हे विकसन आपल्याला घडवित जावे लागेल. राज्यघटनेतील तरतुदींचे प्रत्यक्ष लाभ लोकांना व्हायला हवेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतल्या अखेरच्या भाषणात आपण मागास समाजासाठी प्रागतिक राज्यघटना देत असल्याचे सांगून हा अंतर्विरोध लवकरात लवकर कमी करण्याविषयी सूचित केले होते. तसे करण्यात आपण यशस्वी ठरलो तरच भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थाने देशाचे आत्मचरित्र ठरेल, असे मतही डॉ. चौसाळकर यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश पवार म्हणाले, राज्यघटनेने भारतीय नागरिकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. तिने लोकांना सामाजिक गुलामगिरीकडून मुक्त वातावरणात आणले आहे. देशातील समग्र सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक परिस्थिती पालटण्यासाठी राज्यघटनेने बळ दिलेले आहे. भारतीय संविधानाची मागणी व मुद्दे हे स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आल्याचे डॉ. चौसाळकर यांचे प्रतिपादन लक्षात घेता संविधान हे वेस्टमिन्स्टर मॉडेल नसून भारतीयत्वातूनच पुढे आल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद माने यांनी केले. डॉ. सुखदेव उंदरे यांनी परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर मतीन शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. रविंद्र भणगे, डॉ. प्रकाश कांबळे, विलास सोयम यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहाचा उद्या समारोप

शिवाजी विद्यापीठाच्या भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहाचा समारोप समारंभ उद्या, शनिवारी (दि. ३०) होणार आहे. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील डॉ. रविनंद होवाळ हे उपस्थित राहणार असून ‘भारतीय संवैधानिक मूल्ये’ या विषयावर विशेष व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील.

प्रश्नमंजुषा स्पर्धा १५ डिसेंबरपर्यंत

विद्यापीठाने ‘शिव-वार्ता’ (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवर श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘संविधान: दि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ या मालिकेच्या दहा भागांची प्लेलिस्ट ठेवली आहे. त्या मालिकेवर आधारित खुली ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मालिका पाहून झाल्यानंतर https://forms.gle/jmUK9zNHZ2goG5iK9 या लिंकवर जाऊन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर सहभागींना विद्यापीठाचे ऑनलाईन प्रमाणपत्रही मिळणार आहे. ही स्पर्धा १५ डिसेंबरपर्यंत खुली राहणार असून त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…