no images were found
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची एक्झिट
लखनऊ : सध्या लोकसभेचे खासदार असणारे समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (वय८२) यांचे आज निधन झाले. मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांचेवर उपचार सुरु होते. राजकारणात येण्यापूर्वी मुलायम सिंह यादव शिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ मध्ये झाला. इटावामधील सैफई हे त्यांचे जन्मगाव. मुलायम सिंह यादव यांना ४ भाऊ आणि १ बहीण होती. मुलायम सिंह यादव यांचे शिक्षण करहल येथील जैन इंटर कॉलेजमधून झाले. नंतर ते शिक्षक म्हणून त्याच कॉलेजमध्ये रुजू झाले. ते कॉलेजमध्ये कार्यरत असताना सायकलने ये-जा करीत. पुढे शिक्षक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास झाला. कॉलेजमध्ये सहाय्यक अध्यापक म्हणून सलग १० वर्षे काम केल्यानंतर त्यांना १९७४ मध्ये पदोन्नती मिळाली. या काळात त्यांनी स्वतःचा कुस्तीचा छंद जोपासला.
१९८४ मध्ये त्यांनी जैन इंटर कॉलेजमधील सहाय्यक अध्यापक पदाचा राजीनामा दिला. पुढे राजकारणातील वाटचालीत त्यांनी कॉलेजशी असलेले नाते तसेच कायम ठेवले. ते बऱ्याचवेळेला इटावाच्या जैन इंटर कॉलेजमध्ये जायचे.
इटावा मधील कुस्तीच्या लढतीत त्यांचा संपर्क तत्कालीन आमदार नत्थू सिंह यादव यांच्याशी आला. नत्थूसिंह यादव यांना मुलायम सिंह यादव यांचे व्यक्तिमत्त्व पसंत पडल्यानंतर त्यांनी मुलायम सिंह यादव यांना जसवंतनगर विधानसभा मतदारसंघाशी जोडले. मुलायम सिंह यादव पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पुढे खासदार म्हणून दिल्लीतही पोहोचले. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाने महाविद्यालय देखील सुरु केलेले आहे. मुलायम सिंह यादव यांनी १९६७ मध्ये त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीवेळी स्वतःच्या मित्र परिवारासह सायकलवरुन प्रचार केला होता. राम मनोहर लोहिया यांच्याकडून मिळालेल्या ‘एक नोट आणि एक वोट’ या मंत्रानुसार त्यांनी प्रचार केला व त्यास जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सैफईच्या जनतेनं एका वेळच्या जेवणाचे पैसे वाचवून मुलायम सिंह यादव यांना निवणुकीसाठी रक्कम दिली आणि निधी उभारला. अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय कारकीर्द असलेले समाजवादी पक्षाचे खासदार मुलायम सिंह यादव यांचे आज दुखद निधन झाले आहे. देशातील समाजवादी राजकारणाची ही मोठी हानी मानली जात आहे.