no images were found
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा
मुंबई: महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११.१५ च्या दरम्यान राजभवन गाठलं. यावेळी त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.