no images were found
19 व 20 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे अनिवार्य
कोल्हापूर : मतदाना दिवशी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिराती प्रकाशित होणार नाहीत यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत.
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 अंतर्गत दि.20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी आणि दि. 19 नोव्हेंबर या मतदानाच्या एक दिवस आधी कोणतीही राजकीय जाहिरात प्रिंट मिडीयामध्ये जोपर्यंत राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींना या कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची असल्यास अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हास्तरीय (MCMC समिती) मीडिया संपर्क व्यवस्थापन व सोशल मीडिया कक्ष, सांख्यिकी कार्यालयाजवळ, दुसरा मजला, महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक 0231-2992920) येथे अर्ज करावेत, असे आवाहनही माध्यम कक्षाकडून करण्यात आले आहे.