no images were found
वागले की दुनिया’ मालिकेत आर्थिक घोटाळ्यांविरुद्ध जागरुकतेचा प्रयत्न
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिका नेहमी सामान्य माणसाला दैनंदिन आयुष्यात सतावणाऱ्या समस्या आपल्या मालिकेतून दाखवत असते. मालिकेच्या अलीकडच्या भागात राजेश वागले (सुमित राघवन)ची बॉस कियारा (अंजू जाधव) एका भयंकर आर्थिक घोटाळ्यात अडकली आहे. एकामागून एक तणाव वाढवणाऱ्या घटना घडतात आणि आपण चौकशी अधिकारी असल्याचे नाटक करणारा घोटाळेबाज कियाराला एक फसवा आर्थिक व्यवहार करायला भाग पाडतो. काहीतरी गडबड असल्याची शंका येऊन राजेश मध्ये पडतो आणि जास्त नुकसान होण्यापासून रोखतो.
‘वागले की दुनिया’ ही मालिका सामान्य माणसापुढे येणाऱ्या समस्यांना वाचा फोडत असते. प्रस्तुत कथानक सोनी सबवरील मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाची भूमिका करणाऱ्या करुणा पांडेला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवावरून प्रेरित आहे.करुणाला एक असाच कॉल आला होता, ज्यावरून घोटाळेबाजाने एका अनधिकृत व्यवहाराबाबत सांगून स्वतः चौकशी अधिकारी असल्याची भीती दाखवली होती. या वेधक कथानकातून प्रेक्षकांमध्ये जागरूकता आणण्याचा आणि आर्थिक घोटाळ्याबाबत त्यांना सावध राहण्याचा इशारा देण्याचा उद्देश आहे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा आधार घेऊन तयार केलेले हे कथानक प्रेक्षकांना पडद्यावर बघायला नक्की आवडेल, ज्यामध्ये कियाराला वाचवण्यासाठी राजेश घोटाळेबाजाचा सामना करतो.
राजेश कियाराला या घोटाळ्यातून वेळेवर वाचवू शकेल का?
राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “वागले की दुनिया मालिकेत काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो, कारण ही मालिका प्रत्यक्ष जीवनातील समस्या लोकांपुढे घेऊन येते. केवळ लोकांचे मनोरंजनच करायचे नाही, तर त्यांना कठीण प्रसंगात सतर्क राहून योग्य निर्णय घेण्यासाठी शिक्षित करणे हा देखील आमचा उद्देश आहे. या कथानकाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळ्यांबद्दल जागरूकता आणून प्रेक्षकांना सावध राहण्याचा इशारा आम्ही प्रभावीपणे देऊ शकू अशी मी आशा करतो.”
या कथानकाच्या मागे जिच्या प्रत्यक्ष अनुभवाची प्रेरणा आहे, ती करुणा पांडे म्हणते, “वागले की दुनिया मालिकेत अशा संबद्ध आणि दैनंदिन समस्यांचा ज्या प्रकारे विचार करण्यात येतो, ते कौतुकास्पद आहे. मी स्वतः अशा प्रकारच्या फसवाफसवीचा अनुभव घेतला असल्याने ही कहाणी सगळ्यांशी शेअर करावी असे मला वाटले. जर माझ्या अनुभवाचा उपयोग होऊन इतर कुणी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचत असेल तर हे ही नसे थोडके! जीवनातल्या या कटू गोष्टी अर्थपूर्ण पद्धतीने पडद्यावर साकारण्याचे काम ही मालिका करत आहे, ज्याचा मला आनंद वाटतो.”