Home मनोरंजन झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या दिपावली सणाच्या आठवणी!

झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या दिपावली सणाच्या आठवणी!

2 second read
0
0
13

no images were found

झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या दिपावली सणाच्या आठवणी!

दिव्यांचा सण दिवाळी जवळ येत असून ‘झी टीव्ही’वरील ‘जाने अंजाने हम मिले’तील आयुषी खुराणा, ‘रब से है दुआ’मधील धीरज धूपार, ‘भाग्यलक्ष्मी’तील रोहित सुचांति, ‘कैसे मुझे तुम मिल गये’मधील आकांक्षा पाल, ‘कुमकुम भाग्य’तील राची शर्मा, ‘कुंडली भाग्य’तील अद्रिजा रॉय, ‘वसुधा’तील प्रिया ठाकूर आणि ‘जागृती- एक नयी सुबह’मधील आर्य बब्बर या कलाकारांनी दिवाळीचे महत्त्व सांगितले. चांगल्या शक्तींचा दुष्ट शक्तींवरील विजयाचे प्रतीक असलेला दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. तसेच तब्बल 14 वर्षांच्या वनवासातून भगवान श्रीराम अयोध्येस परतल्याची घटना साजरी करण्यासाठीही दिवाळी साजरी केली जाते. घराघरात दिव्यांची आरास करण्यापासून फटाके फोडण्यापर्यंत आणि पूजा करण्यापासून आपल्या जवळच्या लोकांना मिठाई वाटण्यापर्यंत हा सण साजरा होतो आणि तो कुटुंबियांना एकत्र आणतो. दिवाळी साजरी करण्यात भारतातील प्रत्येक प्रांताचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. उत्तर भारतातील भव्य रामलीला नाट्ये असोत की दक्षिण भारतातील अभ्यंग स्नान आणि प्रार्थना असोत, दिवाळीचा सण हा सर्वांसाठी आनंद, आत्मपरीक्षण आणि एकत्र येण्याची संधी देतो. या सणाबद्दल हे कलाकार काय म्हणतात, ते पहा :

‘जाने अंजाने’मध्ये रीतची भूमिका साकारणारी आयुषी खुराणा म्हणाली, “दिवाळीबद्दल माझ्या कुटुंबियांबरोबर घरात पणत्या लावणं, माझ्या भावंडांबरोबर रांगोळी काढणं आणि भरपूर मिठाई खाणं यासारख्या आठवणी भरल्या आहेत. लहान असताना दिवाळीत आम्ही सर्वजण माझ्या आजोबांच्या घरी एकत्र जमायचो. आम्ही एकत्र आल्यावर सारं घर दिव्यांच्या प्रकाशाने आणि हास्यविनोदाच्या आवाजाने भरून जात असे. आजही माझं हे व्यग्र वेळापत्रक सांभाळून दिवाळीच्या दिवशी मी माझ्या कुटुंबियांबरोबर राहण्याचा प्रयत्न करते. दिवाळीत आम्ही घरी पूजा करतो, सुग्रास भोजन बनवतो आणि घरभर पणत्या लावतो. हा सण केवळ प्रकाशाचा नाहीये, तर एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, आपुलकी आणि एकत्र राहण्याचा आहे. मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. आपल्या नातेवाईकांबरोबर तुमची दिवाळी आनंदात जावो!”

‘रब से है दुआ’मध्ये सुभानची भूमिका साकारणारा धीरज धूपार म्हणाला, “माझ्यासाठी दिवाळी हा नेहमीच एक खास सण राहिला आहे. तो आनंद आणि खास आठवणींनी भरलेला असतो. दिल्लीत लहानाचा मोठा होताना मी अतिशय भव्य प्रमाणावर साजरी होणारी दिवाळी पाहिली आहे. त्या आठवणी माझ्या मनात कायमच्या रुतून बसल्या आहेत. घर दिव्यांनी सजवण्यापासून गोडधोड मिठायांचा आस्वाद घेण्यापर्यंत दिवाळीचा प्रत्येक भाग हा माझ्यासाठी प्रचंड आनंद घेऊन येतो. झेनला फटाके फोडायला आवडतात, पण तरीही ग्रीन फटाक्यांसोबत इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मजा करतानाही आमच्या मनात पर्यावरणाला प्रथम स्थान असेल. दिवाळीचा सण हा आपले कुटुंबीय आणि जवळच्या लोकांबरोबर साजरा केला पाहिजे त्यामुळे माझ्या जवळच्या लोकांना भेटून त्यांच्यासोबत नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि प्रेम व प्रकाशाने भरलेल्या ग्रीन दिवाळीच्या शुभेच्छा!”

‘भाग्यलक्ष्मी’मध्ये ऋषीची भूमिका साकारणारा रोहित सुचांति म्हणाला, “दिवाळीचा सण मी नेहमी माझ्या कुटुंबियांबरोबर साजरा करतो, त्यामुळे हा सण माझ्यासाठी वर्षातील सर्वात आनंददायक काळ असतो. मी लहान असताना माझा भाऊ आणि आई-वडिलांबरोबर घरात सजावट करतानाचा आनंद आणि उत्साह मला अजूनही आठवतो. घरात दिवे लावण्याचा आणि सोसायटीत मित्रांबरोबर फटाके फोडण्याचा आनंद खूपच अधिक असे. दिवाळीत माझ्या आई-वडिलांकडून मला आणि भावाला नेहमी एक विशेष भेटवस्तू मिळत असे त्यामुळे आम्ही दिवाळीची आतुरतेने वाट पाहात असू. कधी रिमोट कंट्रोलवर चालणारी मोटार, तर कधी नवे कपडे किंवा कधी कुटुंबियांबरोबर बाहेरगावी फिरायला जाणं यासारख्या आठवणी मी जन्मभर जपून ठेवणार आहे. यंदाही दिवाळीत मी माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर वेळ व्यतीत करणार हे. नेहमीची परंपरा राखताना यंदाही मी घरी सकाळी छोटेखानी पूजेचं आयोजन केलं असून संध्याकाळी मी मित्रांना भेटणार आहे. दिवाळीबद्दल मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे हा सण सर्वांना एकत्र आणतो. या काळात आजूबाजूला असलेला प्रकाश, नातेवाईकांचं प्रेम आणि सर्वत्र भरून राहिलेला उत्साह यामुळे दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण राहिला आहे.”

‘कुमकुम भाग्य’मध्ये पूर्वीची भूमिका साकारणारी राची शर्मा म्हणाली, “दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तसाच तो आनंद आणि सकारात्मकतेचाही सण आहे. मला दोन प्रकारची दिवाळी उपभोगण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला आठवतंय, इंदौरला लहान असताना मी दिवाळीच्या खूप आधीपासून माझा पॉकेटमनी जपून ठेवत असे आणि त्या पैशांतून मी फटाके विकत आणत असे. तेव्हा आम्ही खूपच धमाल करायचो. आईने बनवलेल्या अनेक स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारायचो. मुंबईतही मला माझ्या मित्रमंडळींबरोबर दिवाळी साजरी करताना, त्यांच्याबरोबर खेळ खेळताना खूप आनंद वाटतो. सणवारांमुळे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांबरोबर वेळ व्यतीत करण्याची संधी मिळते, तिचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे, असं मला वाटतं. पण मला इथे सर्वांना सांगायचं आहे की कृपा करून दिवाळीत फटाके फोडू नका. रस्त्यावरील जनावरांची काळजी घ्या. तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप आनंदाची जावो!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन   कोल्हापूर : स…