no images were found
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी २२,५०० बोनस जाहीर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रुपये; तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे आज जाहीर केले. पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे आज झालेल्या बैठकीत त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली.
कर्मचाऱ्यांना ‘आनंदात दिवाळी साजरी करा, पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन करत ‘कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे, पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’ असे सांगितले. या बैठकीस मुख्यमंत्री शिंदे यांचेसह खासदार राहुल शेवाळे, आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना या दिवाळी बोनसमुळे दिलासा मिळेल.