no images were found
पैशाच्या वादातून तासगावमध्ये शिवसेना शहर प्रमुखासह दोन मुलांवर प्राणघातक हल्ला
सांगली : तासगाव (जि. सांगली) शहर शिवसेना प्रमुख व त्यांच्या दोन मुलांसह चौघांवर पैशाच्या देवाणघेवाणीतून प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चाकू, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सावंत, रोहित सावंत, प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर यांच्यासह दोन अनोळखी अशा ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेना शहर प्रमुख संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंत यांना उसने दिलेले पैसे दिले होते; हे उसने पैसे संजय चव्हाण यांनी परत मागितले असत सावंतने चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सावंत याला जाब विचारण्यासाठी चव्हाण यांची दोन मुले अभिषेक व पवन हे त्याठिकाणी आले. याचवेळी वादावादीस सुरुवात झाली. वाद मिटवण्यासाठी चव्हाण हे पुढे आले असता प्रमोद सावंत याने चव्हाण यांना उद्देशून ‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच आहेत, तुला दाखवतोच, आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही’, अशी धमकी दिली.
दरम्यान प्रमोद सावंतसोबत आलेल्या रोहित सावंतने संजय चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार केला. चव्हाण यांनी तो वार चुकविला. त्यानंतर रोहित याने केलेला वार चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस लागला. याचवेळी प्रदीप दरेकरने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात मारले. चव्हाण यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अभिषेक यालाही प्रमोद दरेकर व अन्य एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारहाण केली. चव्हाण यांचा दुसरा मुलगा पवन यालाही अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण साळुंखे यांना प्रमोद सावंतने डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.