no images were found
शैक्षणिक सामग्री तयार करण्यासाठी ए.आय.चा वापर महत्वाचा : डॉ.राजेंद्र पारिजात
कोल्हापूर(प्रतिनिधी) : वैयक्तिक गरजेनुसार शैक्षणिक सामग्री तयार करण्यासाठी ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन सायबर इन्स्टिट्यूट येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.राजेंद्र पारिजात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विविध साहित्यिक, विचारवंत यांचे नावे सुरु असलेल्या अध्यासन व केंद्रे यासाठी दोन दिवशीय पी. एम. उषा : सॉफ्ट कॉम्पोनन्ट ओडिएल अँड मुक्स प्रोग्रॅम अंतर्गत ई – कन्टेन्ट विकसन कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपकुलसचिव श्री. व्ही. बी. शिंदे, डॉ. आर. ए. कुंभार, डॉ. टी. आर. गुरव, डॉ. अविनाश भाले, डॉ. कुलदीप उंदरे यांसह शिवाजी विद्यापीठातील विविध केंद्र व अध्यासनामधील विषय तज्ज्ञ व
शिक्षक उपस्थित होते.
डॉ.पारिजात म्हणाले, स्वयंचलित चालणारी साधने वापरामुळे भाषांतर, प्रश्नमंजुषा आणि मूल्यांकनांची निर्मिती यासारख्या काही प्रक्रिया गतिशील होण्यास व वेळ वाचण्यास मदत झाली आहे. ई – कन्टेन्ट बनविताना शैक्षणिक पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. शैक्षणिक सामग्रीचे परिवर्तन करण्यासाठी ए.आय. मदत करते. तसेच धोरणात्मक सहयोग आणि अनुकूलनाद्वारे तांत्रिक आणि नैतिक अडथळ्यांवर मात करण्याचे काम देखील करते. डॉ.पारिजात यांनी संत कबीर यांच्यावर बनविलेला ई – कन्टेन्ट यावेळी सादर केला.या ई – कन्टेन्टमधून संत कबीर आणि त्यांचे जीवन प्रभावीपणे दाखविण्यात आले.
तसेच कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.बी.डी.दामले म्हणाले की, ई – कन्टेन्टचे विविध पैलू आहेत.त्याचे विविध सादरीकरणाचे टप्पे आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्व घटकांसाठी आहे. ई – कन्टेन्ट निर्मितीसाठी उपयोगात आणणारी स्क्रिप्ट च्या बाबतीत दोन प्रकार पड्तात. एक शैक्षणिक आणि दोन प्रसंगावर आधारित आहेत.स्क्रिप्ट्स लेखकांची व सादरीकरण करणाराची फळी निमार्ण केली पाहिजे.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. चांगदेव बंडगर यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. नितीन रणदिवे यांनी केले.डॉ.सचिन भोसले यांनी आभार मानले.