no images were found
श्री राम आणि त्याच्या पुत्रांच्या भेटीच्या उत्कंठे विषयी सांगत आहे अभिनेता सुजय रेऊ
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ रामायण ही मालिका त्यातील दिव्य कथानकाच्या उत्कृष्ट मांडणीमुळे लोकांना आवडली आहे. अभिनेता सुजय रेऊ या मालिकेत श्रीरामाची भूमिका करत आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, श्रीराम आणि सीतेचे (प्राची बंसल) पुत्र लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) मारकासुर दैत्याला ठार करतात. ते पाहून, सीता आपल्या मुलांसह ज्या ठिकाणी राहात असते, त्याच जंगलात उपस्थित असलेला सीतेचा पिता, जनक राजा (जितेन लालवाणी) खूप प्रभावित होतो.
आगामी भागांमध्ये जनक राजा आश्रमात भेटलेल्या त्या दोन असामान्य प्रतिभेच्या मुलांचा विचार करता करता, मिथिलेत एका धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करतो. लव आणि कुश या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करत असतानाच श्रीराम आपल्या अश्वमेध यज्ञाची तयारी करत आहेत आणि या यज्ञाचे आमंत्रण आपले श्वशुर राजा जनक यांना देण्यासाठी मिथिलेकडे जाण्यास निघाले आहेत. श्रीरामाची कीर्ती लव आणि कुश यांच्या कानावर आधीच आलेली आहे. ते दोघे दुरूनच श्रीरामाला बघतात. पिता आणि पुत्रांची भेट होणार का याची उत्कंठा वाढवणारा हा प्रसंग आहे.
श्रीराम आणि लव-कुश अखेरीस भेटणार का, की त्यांची चुकामुक होणार?
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करत असलेला सुजय रेऊ म्हणतो, “कथानकातील हा भाग विशेष आहे, कारण यावेळी श्रीरामाची ती बाजू आपल्याला दिसते, जी आजवर फारशी दिसलेली नाही- केवळ एक राजा किंवा योद्धा नाही, तर एक पिता म्हणून त्यांचे दर्शन घडते. अर्थात ही आपलीच मुले आहेत हे अद्याप त्यांना माहीत नाही. त्या क्षणी श्रीरामांना ही कल्पना नाही की लव आणि कुश त्यांचे पुत्र आहेत. ते त्या दोघांकडे केवळ एक अप्रतिम धनुर्धर म्हणून कौतुकाने पाहात आहेत. ते कोण आहेत आणि कुठून आले आहेत याबद्दल त्यांना कुतूहल आहे. त्यांच्या मनात मिश्र भावना आहेत- कौतुक, कुतूहल आणि कदाचित मनात खोलवर जाणवलेला एक बंध ज्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाही. जीवन पालटून टाकण्याची क्षमता असलेल्या क्षणाच्या उंबरठ्यावर श्रीराम उभे आहेत. अशा वेळी त्यांच्या मनातील भावनांचा कल्लोळ पडद्यावर साकार करताना मी उत्तेजित झालो आहे. या पुढील प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक नवीन पैलू पुढे येणार आहेत- केवळ एक नायक नाही, तर एक पिता या नात्याने!”