no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पा आणि दिलीपचे नाते जिवंत होत असतानाच दिलीपसमोर आली भयंकर परिस्थिती
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील पुष्पा (करुणा पांडे) या करारी स्त्रीची, तिच्या अढळ आशावादाची कहाणी प्रेक्षकांना खूप भावली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, केवळ दोन आठवड्यात मोठ्या संख्येत पटोळा साड्या विणण्याचे आव्हान पुष्पा आणि जुगल (अंशुल त्रिवेदी) या दोघांनी स्वीकारले आहे. ते दोघे हे अशक्य काम करून दाखवतात आणि कानपूर येथे होणाऱ्या एका प्रतिष्ठित प्रदर्शनात स्थान मिळवतात.
आगामी भागांमध्ये, पुष्पा आणि जुगल आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी जोमाने काम करतात, त्याच वेळी पुष्पाच्या समोर आणखी एक समस्या उभी आहे- प्री बोर्ड परीक्षेची तयारी करण्याची समस्या! यावेळी तिला तिचा पूर्वीचा पती दिलीप पटेल (जयेश मोरे) याची मदत आणि आधार मिळतो. तो तिला तिच्या अभ्यासात मदत करतो. या दरम्यान त्यांच्यातील नाते हळूहळू सकारात्मक होऊ लागते, पुष्पा दिलीपवर आपला विश्वास व्यक्त करते. पण ही परिस्थिती फार काळ टिकत नाही, कारण दिलीपला त्याच्या कट्टर शत्रूकडून भोसकण्यात येते. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून पुष्पाचे जीवन उद्ध्वस्त होते. हे कृत्य कोणी केले असावे हा प्रश्न तिला छळत असतो.
गुन्हेगाराला शोधून पुष्पा दिलीपचा जीव वाचवू शकेल का?
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पाची शीर्षक भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “पुष्पा आणि दिलीपचे नाते पहिल्यापासून गुंतागुंतीचे आहे. पण जेव्हा ते नाते पुन्हा जुळू लागते, तेव्हा पुष्पासाठी तो भावुक क्षण असतो. परत एकदा ती त्याच्यावर विश्वास ठेवू लागते.. आणि त्याचवेळी दिलीपला कुणी तरी भोसकते आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून ती अंतर्बाह्य हादरून जाते. एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांनी तिच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. पुष्पाची ताकद अशी आहे की, गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढल्याखेरीज ती गप्प बसणार नाही आणि न्याय मिळवण्यासाठी लढत राहील. आगामी काही भागांत तिच्या धैर्याची परीक्षा होणार आहे.”