no images were found
गडहिंग्लज मधील जवानाचा उत्तर प्रदेशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यामधील वडरगे (जि. कोल्हापूर) येथील जवान दीपक दिनकर गायकवाड (वय 34) यांचे उत्तर प्रदेशात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते उत्तर प्रदेशातील झाशी या ठिकाणी कर्तव्यावर असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या पस्तीशीतील जवानाचा मृत्यूने तालुक्यात शोककळा पसरली आहे. दीपक यांनी गेल्या 18 वर्षांच्या कार्यकालात आसाम, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांचे वडीलही भारतीय सैन्य दलात होते.
दीपक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे. दीपक यांचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत वडरगे गावातील विद्यामंदिर शाळेत झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद हायस्कूल गडहिंग्लज येथे झाले. बारावीनंतर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार दीपक गायकवाड हे भारतीय सैन्य दलात सन 2004 मध्ये भरती झाले होते. भरती झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले होते. दीपक 11 जुलै रोजी गावाकडून कुटुंबासोबत झाशी येथे गेले होते. बुधवारी सकाळी सुमारे ११.०० च्या दरम्यान चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर पत्नी पूजा यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.