no images were found
अमेरिकेत अपहरण झालेलं भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं
कॅलिफॉर्निया : अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधून अपहरण झालेल्या एकाच पंजाबी कुटुंबातील चार सदस्यांचं मृतदेह सापडले आहेत. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. पंजाबी कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरातच त्यांचे मृतदेह आढळून आले.
अमेरिकेत या कुटुंबाचा वाहतूक व्यवसाय होता. हे कुटुंब मूळचे पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील टांडामधील हरसी गावचे. सोमवारी त्यांचे अपहरण झाले. त्यांची कार रस्त्याच्या कडेला जळालेल्या स्थितीत सापडली. अपहरणकर्त्याने पैशांची मागणी केलेली नव्हती. त्यामुळे कुटुंबाचं अपहरण पैशांसाठी झाले नसल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात होती. अपहरणानंतर पोलिसांनी एका व्यक्तीचे दोन फोटो प्रसिद्ध केले होते. संशयिताची माहिती पोलिसांकडून जारी करण्यात आली होती. त्याचे वर्णनही प्रसिद्ध करण्यात आले होते. अपहरणानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न झाला होता. संशयितानं कुटुंबाच्या एटीएम कार्डचा वापर केला होता. बंदुकीच्या धाकानं कुटुंबाचं अहरण करण्यात आलं असावं अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.
कुटुंबातील चौघांचे मृतदेह एका बागेत सापडले. राज्याचे शेरिफ वर्न वार्नके यांनी ही माहिती दिली. आम्हाला ज्याची भीती होती, नेमकं तेच घडलं, असं वार्नके म्हणाले. मृतांमध्ये ८ महिन्यांची आरुही धेरी, तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीप सिंग (३६), जसदीप यांचा भाऊ अमनदीप सिंग (३९) यांचा समावेश आहे. एका लुटारून कुटुंबाचं अपहरण केलं. एक दिवसानंतर त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आधी पोलिसांकडून देण्यात आली होती.