no images were found
विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे– सी. पी. राधाकृष्णन
मुंबई :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले.
राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार पराग शहा, माजी खासदार गोपाळ
शेट्टी, विद्या चव्हाण तसेच सुभाष देसाई, प्रकाश रेड्डी, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक विकास कामे, योजना राबवित आहे. या योजनांमधून नागरिकांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. या योजनांच्या, प्रकल्पांच्या पूर्तीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. विकास कामांबाबत ज्यांना काही सुचवायचे असल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे लेखी घ्यावे,असे ते म्हणाले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यपालांनी साधला संवाद
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज भवन येथे उद्योग, आदिवासी, अल्पसंख्यांक डीआयसीसीआय, तृतीयपंथी, दिव्यांग, खेळाडू आणि मागासवर्गीय यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल. या मान्यवरांनी उपस्थित केलेल्या सूचना, मांडलेले प्रश्न सोडवण्यास संबधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे,अशा सूचना त्यांनी दिल्या. तृतीयपंथी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबत निर्देश दिले जातील, असे राज्यपाल महोदयांनी सांगितले. जे प्रश्न स्थानिक पातळीवरचे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावेत, असेही ते म्हणाले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतला आढावा
नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाची कामे संबधित यंत्रणांनी निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना दिल्या.
बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरसीएएल च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित दहिया, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ही कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करावा. प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत. विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. मुंबई उपनगर जिल्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुयोग्य नियोजन व्हावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत राज्यपाल महोदयांनी मेट्रो, रेल्वे, रस्ते, म्हाडा, वन, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था या विषयीचा आढावा घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सादरीकरणातून मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे व उपक्रमांची माहिती दिली.