no images were found
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर
पुणे :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय तपासणी समितीचे सदस्य सचिव विजय मुळीक यांनी कळविली आहे.
विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, प्रभारी उपसंचालक (माहिती), पुणे वर्षा पाटोळे, सहाय्यक आयुक्त विकास, पुणे डॉ.सोनाली घुले यांचा समितीमध्ये समावेश होता.
विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार विभागस्तरीय पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती व बक्षिसाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम (१२लक्ष), सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव द्वितीय (९ लक्ष) आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीला तृतीय (७ लक्ष) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार-घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सांडगेवाडी ग्रामपंचायतीला पाणी व गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गोयेगाव ग्रामपंचायतीला स्व.आबासाहेब खेडेकर (शौचालय व्यवस्थापन) प्रत्येकी ७५ हजार रुपये रकमेचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे असेही श्री. मुळीक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.