
no images were found
अंदाधुंद गोळीबाराने मॅक्सिकोत महापौरांसह १८ जणांचा मृत्यू
सिटी हॉलमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; महापौर, पोलिसांसह तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू
मेक्सिकोतील सॅन मेगुल टोटोलेपन येथे असलेल्या सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महापौरांचाही समावेश असल्याचे समजते. सिटी हॉलमध्ये आणि परिसरात गोळीबाराच्या वेळेस गोंधळ उडाला. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गोळीबार घटनेच्यावेळी सिटी हॉलमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. बुधवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरांनी धोकादायक शस्त्रांचा वापर केला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये नगर सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसत आहेत. यासोबतच इमारतीवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर गोळीबाराच्या खुणा आहेत.
स्थानिक मीडियानुसार, या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि चित्रांमध्ये सभागृहाबाहेर केवळ 18 मृतदेह पडलेले दिसत आहेत. त्यानुसार आतापर्यंत १८ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये शहराचे महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील, माजी महापौर जुआन मेंडोझा आणि सात महापालिका पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिटी हॉलवर गोळीबार करण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरात बस आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मेक्सिकोमध्ये गुन्हेगारांच्या वतीने हल्ले करताना असे प्रकार अनेकवेळा आढळतात.
लॉस टेकलेरोस या गुन्हेगारी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महापौर कोनराडो मेंडोझा हे मेक्सिकोच्या पीआरडी पक्षाशी संबंधित होते. या पक्षानेही महापौरांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पक्षाने त्यांच्या मृत्यूचा निषेध केला असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मेक्सिकोतील गेल्या काही आठवड्यांमधील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.