no images were found
दोन बसची भीषण धडक; विद्यार्थी आणि शिक्षकांसह ९ जणांचा मृत्यू
केरळमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक असे नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस तपास सुरू आहे.
केरळ : आज सकाळी केरळ येथे दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अंदाजे ४० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे २ वेगातील बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. एर्नाकुलममधील मुलंथुरुथी येथील बसेलियस शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस जात असताना पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीच्या बसला धडकली. या दुर्घटनेनंतर मोठा आरडाओरडा झाला आणि यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. कारला ओव्हरटेक करताना पर्यटक बसचे नियंत्रण सुटून केएसआरटीसी बसला मागून अपघात झाला. ताबा सुटल्यानंतर पर्यटक बस नजीक असलेल्या दलदलीत जाऊन धडकली. वलयार-वडक्कनचेरी राष्ट्रीय महामार्गावरील अंजुमूर्ती मंगलम बस स्टॉपजवळ हा अपघात घडला.
गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले असून २८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. टुरिस्ट बसमध्ये ४१ विद्यार्थी, पाच शिक्षक आणि दोन कर्मचारी होते. केएसआरटीसी बसमध्ये ४९ प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वर्तविले जात आहे.