no images were found
लघुपटात शास्त्रीय प्रक्रियेचा अवलंब हवा : खूपेरकर
कोल्हापूर ( प्रतिनिधी): लघुपट निर्मिती सामूहिक कष्टाचे फलीत असते. लघुपटामध्ये तांत्रिक बाबींबरोबरच शास्त्रीय प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे मत ‘गोंधळ’ लघुपटाचे दिग्दर्शक मुकुंद खुपेरकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात लघुपटाची निर्मिती प्रक्रिया या विषयावर ते बोलत होते. यावेळी ‘गोंधळ’ या लघुपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.
खुपेरकर म्हणाले, लघुपटांकडे मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे, तरच ती कलाकृती उत्तम होऊ शकते. या क्षेत्रामध्ये टिकून राहायचे असेल तर प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. लघुपट निर्मितीसाठी वाचन हवे, त्यासोबतच स्वअनुभव आणि निरीक्षण कौशल्य हवे.
निर्माता अमित चव्हाण म्हणाले, कोणत्याही लघुपटासाठी बजेट अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र निर्मात्याने बजेट घातले म्हणून सर्व निर्णय स्वतः घेण्याची गरज नाही. दिग्दर्शकाला त्याने स्वातंत्र्य दिले तर निश्चितपणे उत्तम पद्धतीचा लघुपट तयार होऊ शकतो.
अभिनेत्री अस्मिता खटावकर यांनी अभिनयासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वागत आणि प्रास्ताविक बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन पार्थ मालवणकर याने तर पाहुण्यांची ओळख प्रवीण पांढरे याने करून दिली. आभार अवधूत चव्हाण याने मानले. यावेळी राधिका खुपेरकर, बाल कलाकार शर्वरी, शेजल सावंत, प्रमोद केशव गिरी, कॅमेरामन कीर्तीकुमार पाटील, अनुप जत्राटकर, जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.