no images were found
एकनाथ शिंदेविरुद्ध मनसे उमेदवार देणार?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. मनसेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातूनही उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे. मनसे नेते आणि लेखक-दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचं नाव एकनाथ शिंदेंच्या विरोधात आघाडीवर आहे. ठाणे विधानसभा क्षेत्रातील निरीक्षकांच्या अहवालात अभिजीत पानसे यांचे नाव कोपरी-पाचपाखडी मतदारसंघासाठी देण्यात आलं आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात महेश कदम या मनसे उपाध्यक्ष उमेदवारानं 25 हजार मतं मिळवलेली होती.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या राजकीय भेटीमागील समिकरणं सध्या जोरदार चर्चेत असून ही भेट जवळपास 30 मिनिटं सुरु होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये काय झालं यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. सदर बैठकीला अमित ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी 30 मिनिटं बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली. बैठकीत विधानसभा निवडणुक विशेषत: मुंबईतील काही मतदारसंघासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही भेट मोठी राजकीय भेट असल्याचं सांगितलं जात असून या बैठकीमधून नवीन राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी यापूर्वीच मनसैनिकांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अनेक जागांवर मनसेनं दावा केला आहे. खास करुन वरळीचा जागा अशीच आहे जिथे मनसेने दावा केला असून या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचीही नजर आहे.