no images were found
पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सर्वच लाभार्थ्यांनी पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांनी केले आहे.
आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाची खबरदारी घेऊन भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमाततून देण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासी समाज ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटूंब व लाभार्थ्यांचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने, दि. १८ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत या अभियानास मंजुरी मिळाली आहे. दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी या अभियानाचा शुभारंभ प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे.
गावांना मिळणार या सुविधा – रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, मोबाईल मेडीकल युनिट, उज्वला गॅस योजना, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोषण स्थिती सुधारणे, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, कृषी विभागाच्या योजनेचा लाभ देणे, मत्स्यव्यवसाय करण्यास चालना देणे, शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह यांच्या पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे, आदिवसी बहुउद्देशीय विपणन केंद्र स्थापन करणे, सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे इ. विविध प्रकारचे लाभ देण्याबाबतची कार्यवाही ही नियोजनबध्दरित्या पुढील ५ वर्षामध्ये करण्यात येणार असुन एकुण-१७ विभागामार्फत हे सर्व लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे, आदिवासी बहुल गावांचा सर्वांगीण विकास होणार असुन आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थीती उंचावण्यास मदत होणार आहे.
आदिवासी गावात ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोबर राहणे) आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातुन स्वदेश दर्शन अंतर्गत पर्यटन क्षमता असलेल्या प्रत्येक गावात ५ ते १० ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोबर राहणे) बांधणेसाठी आदिवासी कुटुंबांना निधी दिला जाणार आहे. तसेच आदिवासी सामाजिक संस्था/संघटना, आदिवासी स्वयंसेवक यांनी एकात्मिक आदिवासी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव जि.पुणे या कार्यालयाशी समन्वय साधुन प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाचा एक भाग होण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले आहे.