
no images were found
श्रीमद् रामायण’मध्ये पती वियोगाने व्यथित झालेली सीता लवकरच लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म देणार
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ही मालिका श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची कहाणी विशद करते. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, श्रीराम आणि सीता यांनी आपल्या अपत्याच्या आगमनापूर्वीचे विधी केले.
आगामी भागांमध्ये श्रीराम सीतेला सांगतात की, त्यांना होणाऱ्या जुळ्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांना विभक्त व्हावेच लागेल, कारण अयोध्येचे वातावरण त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी योग्य राहिलेले नाही. मनातील खिन्नता दाबून ते उदात्त हेतूने एकमेकांचा वियोग सहन करण्यास सज्ज होतात. अत्यंत नाईलाजाने लक्ष्मण (बसंत भट्ट) सीतेला जंगलात घेऊन जातो. सीता वनवासातील आपली वल्कले परिधान करते. श्रीराम देखील आपला राजाचा पोशाख त्यागून सीतेसारखे जीवन कंठण्यासाठी साधे वस्त्र परिधान करतात. जंगलात गेल्यावर सीता वाल्मिकी ऋषींनाभेटते.ते तिची राहण्याची सोय करतात. त्याच ठिकाणी सीता लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म देते. लव आणि कुश मोठे होत असतात. राम आणि सीतेची कथा ऐकून ते मंत्रमुग्ध होतात. साक्षात श्रीराम आपले पिता आहेत, हे मात्र त्यांना त्यावेळी ज्ञात नसते.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारा सुजय रेऊ म्हणतो, “श्रीराम आणि सीता आपल्या मुलांच्या हितासाठी आणि राज्याच्या कल्याणासाठी परस्पर सहमतीने एकमेकांपासून दूर जाण्यास सिद्ध होतात, तो कथानकाचा भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि आत्तापर्यंत आपण जी कथा ऐकत आलो आहोत, त्यापेक्षा खूप वेगळा आहे. या दृश्यांचे शूटिंग करताना त्या व्यक्तिरेखांच्या विभक्त होण्याचे भावनिक ओझे आम्हाला जाणवत होते आणि आम्हा सर्वांसाठी तो आम्हाला खोलवर हेलावून सोडणारा क्षण होता. अभिनेते म्हणून त्या व्यक्तिरेखांचे दुःख आम्ही अनुभवत होतो, तसेच त्यांची ताकद आणि दृढता देखील आम्हाला जाणवत होती. श्रीराम आणि सीता यांनी केलेल्या त्यागातून आपल्याला समजते की, जनकल्याणासाठी दिव्य विभूतींना देखील फार कठोर निर्णय घ्यावे लागतात.हा एक असा दृष्टिकोन आहे, ज्यातून त्यांची निःस्वार्थ वृत्ती अधोरेखित होते आणि मला वाटते की, प्रेक्षकांना हे कथानक खोल भावनिक पातळीवर अनुभवता येईल.”