
no images were found
दीन दयाल स्पर्श योजनेसाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर: विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करुन देण्यासाठी टपाल खात्यामार्फत “दीन दयाल स्पर्श योजना” राबविली जात आहे. इयत्ता 6 वी ते 9 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकिट संग्रह खाते योजना (फिलॅटेली डिपोझिट योजना) सुरु केली आहे. ई-मेल, व्हॉट्स अॅप, फेसबुक व ट्विटरसारख्या मोशल मीडियाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोस्टल स्टॅम्प अर्थात टपाल तिकिटे संग्रह करण्याचा छंद जडावा यासाठी टपाल खात्याने टपाल तिकिट संग्रह खाते योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
योजनेची माहिती-
फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्कलद्वारा 6 वी ते 9 वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रत्येकी 10 अशा जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम 500 रु. प्रतिमाहच्या दराने 6 हजार रुपये प्रतिवर्ष अशी असेल (एका वर्षासाठी). विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा व त्याला नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण (अजा. व अज. यांना 55 टक्के) असावेत. त्या शाळेचा फिलॅटेली क्लब असावा आणि तो विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असावा. जर शाळेचा फिलॅटेली क्लब नसेल तर त्या संबंधीत विद्यार्थ्यांचे स्वतंत्र टपाल तिकिट संग्रह खाते (Philately deposit account) असावे. या योजनेत विद्यार्थ्यांची निवड ही फिलॅटेली प्रकल्प कार्यावरील मुल्यांकनावर किंवा सर्कल ऑफिसकडून आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतील कामगिरीवर केली जाईल. सर्कल स्तरावर स्थापन करण्यात आलेली एक समिती, ज्यामध्ये टपाल पदाधिकारी आणि प्रसिद्ध फिलॅटेलिस्ट असतील, ज्यांच्याकडून उमेदवाराने सादर केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल.ज्या विषयावर प्रकल्प कार्य करायचे आहे त्या विषयाची सूची सर्कल ऑफिसद्वारा अधिसूचना जारी करतेवेळी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे संयुक्त खाते उघडावे लागेल. प्रत्येक पोस्टल सर्कल पारितोषिकांची निवड करेल आणि लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी POSB / IPPB ला सुचना देईल. 31 ऑगस्टपर्यंत या कार्यालयास प्राप्त झालेले विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील, असे पत्रकाव्दारे कळविले आहे.