
no images were found
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ उपस्थित राहिले
व्हॅटिकन सिटी : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या. त्यांनी भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त केला. राष्ट्रपतींसोबत केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डीसूझा होते.राष्ट्रपती २५ तारखेला रोममध्ये दाखल झाल्या आणि २६ तारखेला झालेल्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी श्रद्धांजली वाहिली.” २१ एप्रिल २०२५ रोजी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता आणि भारतीय लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम नेहमीच जपले जाईल असे नमूद केले होते.परराष्ट्र व्यवहार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी नवी दिल्लीतील अपोस्टोलिक नन्सिएचर किंवा दूतावासाला भेट दिली होती. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल भारताने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.