
no images were found
मानसिक समस्या असणाऱ्यांनी टेलिमानस टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
कोल्हापूर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. मानसिक समस्या आढळल्यास 14416 किंवा 18008914416 या टेलिमानस टोल फ्री क्रमांकावर तणावग्रस्त व्यक्ती मोकळेपणाने बोलु शकतात. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सेवा रुग्णालय, कसबा बावडा, दुसरा मजला येथे तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय मनशक्ती क्लिनिक अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही मोफत मानसोपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून मानसिक समस्या असणाऱ्या रुग्णांनी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले आहे.
आत्महत्येची अनेक कारणं असू शकतात. दिर्घकाळ तणाव, दिर्घकाळ आजार, मानसिक आजार (मुख्यतः नैराश्य), परिक्षेतील, व्यवसायातील अपयश, कर्जबाजारीपणा व शेतीतील नुकसान, नातेसंबंधातील बिघाड, प्रेमभंग, शारीरिक, लैंगिक, मानसिक छळ, व्यसन (दारु इ.), पुर्वीचा आत्महत्येचा प्रयत्न, भावनाविवश होऊन तडकाफडकी निर्णय इत्यादी समस्यांतुन आलेले नैराश्य, हतबल झाल्याची आणि एकाकीपणाची भावना अनावर झालेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडतात. अशा घटना घडू नयेत यासाठी मानसिक तणाव, समस्या आढळल्यास वरील टेलीमानस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.