no images were found
प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका – संजय तेली
कोल्हापूर : दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या व फाटलेल्या ध्वजांचे संकलन करुन राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमुद कार्यपध्दतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका स्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहेत.
दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी व त्यानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नेमण्यात आलेल्या समित्यांनी करावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांनी केले आहे.