no images were found
दसरा मेळाव्याआधी शिवसेना आणि शिंदे गटाकडून टीझर वॉर सुरू
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेल्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला होता. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. दुसऱ्या बाजूला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधीच शिवसेना आणि शिंदे गटात टीझर वॉर सुरू झाले आहे. शिंदे गटाने दोन टीझर लाँच केले असून शिवसेनेने आज पहिला टीझर लाँच केला आहे.
शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूने गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने गुरुवारी आणि शुक्रवारी टीझर लाँच केले आहेत. गुरुवारी लाँच केलेल्या टीझरमध्ये ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ अशा ओळी आहेत. टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. शुक्रवारीदेखील शिंदे गटाने एक टीझर लाँच केला असून यामध्ये सभेला येण्याचे आवाहन करताना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तसेच, शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला ‘निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार’ अशा ओळी असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी साद आहे. त्याशिवाय, दसरा मेळावा, शिवसेनेच्या जाहीर सभेतील दृष्ये आहेत. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा टीझर लाँच करण्यात आला आहे.