
no images were found
सावत्र आईच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
डोंबिवली : सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत कार्तिक संजय जैस्वाल या साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. कार्तिकच्या सावत्र आईला टिळकनगर पोलिसांनी आज सकाळी अटक केली. अमितादेवी संजय जैस्वाल ( वय २८ ) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेला असेल्या गोग्रसवाडी येथे राहणारे संजय जैस्वाल हे चहा विकतात. त्यांचा मुलगा कार्तिक याला मारहाण झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्याच्या वडिलांनी गुरुवारी दाखल केले होते. कार्तिकवर मारहाणीच्या जखमा होत्या. रुग्णालय प्रशासनाला या मारहाणीबद्दल संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. कार्तिकला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात गुरुवारी दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कार्तिक हा अमितादेवी जैयस्वाल हिचा सावत्र मुलगा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपी अमितादेवी ही कार्तिकचा सतत द्वेष करत होती. त्याला सतत मारहाण करत होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महिलेला एक मुलगी आहे. हे कुटुंब अलिकडेच डोंबिवलीत राहायला आलंय. घरात कोणी नसल्याचे पाहून अमितादेवीने कार्तिकला आपल्या राहत्या घरात गुरुवारी दुपारी लाथाबुक्क्यांनी, हाताने आणि घरातील वायरीच्या तुकड्याने झोडपून काढले. या मारहाणीत कार्तिक गंभीर जखमी झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे अमितादेवीने हिने कार्तिकला जीवे ठार मारल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सरडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.