Home शैक्षणिक सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे अण्णाभाऊ साठे महान कॉम्रेड: आनंद मेणसे

सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे अण्णाभाऊ साठे महान कॉम्रेड: आनंद मेणसे

5 second read
0
0
31

no images were found

सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे अण्णाभाऊ साठे महान कॉम्रेड: आनंद मेणसे

 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : मूलगामी सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे अण्णाभाऊ साठे हे महान कॉम्रेड होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णाभाऊ यांच्या जयंतीनिमित्त ‘अण्णाभाऊ साठे: जीवन व कार्य’ या विषयावर डॉ. मेणसे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी अधिविभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील योगदानासह कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानही अधोरेखित केले. ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी कॉ. डांगे यांनी पुकारलेला गिरणी संप फोडण्याचे भांडवलदारी प्रयत्न लहानपणीच खूप जवळून पाहिल्यामुळे या घटनेचा त्यांच्या मनावर प्रदीर्घ परिणाम झाला. त्यातून कामगारांच्या दुःखांविषयी ते सजग झाले. मॅक्झिम गॉर्की वाचल्यानंतर या दुःखांना वाचा फोडण्याचे लेखनासारखे प्रभावी शस्त्र त्यांनी हाती धरले. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळींच्या घुसळणीच्या त्या कालखंडात संवेदनशील अण्णांनी जाणीवपूर्वक लाल बावटा हाती घेतला आणि अखेरपर्यंत तो अभिमानाने खांद्यावर मिरविला. चळवळीचा आशय आणि तत्त्वज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे आव्हान नेतृत्वापुढे होते. ते अण्णाभाऊंसह शाहीर अमर शेख, गवाणकर यांनी आपल्या कलापथकांच्या माध्यमातून साध्य केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही या कलापथकाने प्रभावी कामगिरी बजावली. अण्णाभाऊंनी ‘माझी मैना’ ही छक्कड लिहून जणू संयुक्त महाराष्ट्राची अपेक्षा आणि वेदना या दोन्ही बाबी मांडल्या. त्यातील आर्तता आजही भिडल्याशिवाय राहात नाही. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत चळवळ पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले.

डॉ. मेणसे पुढे म्हणाले, अण्णाभाऊंनी साहित्याचे सर्व प्रकार लीलया हाताळले. त्यांचे लेखन म्हणजे स्त्रीवादी साहित्याचा जणू एक मापदंडच होता. तरीही मराठी साहित्यिकांनी त्यांना नवकथाकार म्हणून मान्यता दिली नाही. अण्णाभाऊंची ही उपेक्षा कोल्हापूरने दूर केली. कॉ. गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरात अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन भरवून त्यांचे वेगळ्या अंगाने स्मरण करून दिले. त्यांची पुस्तके पुनर्मुद्रित केली तसेच त्यांचे अनेक लेखही शोधून प्रकाशित केले. त्यामुळे अण्णाभाऊंचे कार्य लोकांसमोर नव्याने आले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य बहुआयामी स्वरुपाचे आहे. केवळ मराठी विषयाच्याच नव्हे, तर सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य वाचायला हवे. अण्णाभाऊ अत्यंत संघर्षातून शिकले, समाजाला शिकविले आणि रशियन सरकारकडून सन्मान मिळविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली, ही त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे. डॉ. मेणसे यांनी त्यांचे कार्य अभ्यासपूर्ण पद्धतीने समोर आणले आहे. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी आणलेली योजना संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कामी डॉ. मेणसे यांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही कुलगुरूंनी आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. जगन कराडे, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. अवनीश पाटील, विश्वास सुतार, डॉ. मेघा पानसरे, डॉ. के.एम. गरडकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …