
no images were found
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून जिल्हा पाणी व स्वच्छता समितीच्या बैठकीत सूचना
कोल्हापूर, : जल जीवन मिशन तसेच इतर नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये नव्याने विविध घटकांचा समावेश ग्रामपंचायत स्तरावरून तांत्रिक बाजू न पडताळता होण्याची शक्यता असते, त्या घटकांची तांत्रिक बाजू पडताळूनच त्याचा समावेश योजनेमध्ये करावा. गावाने सूचना केली म्हणून कोणतेही काम सुधारीत योजना करीत असताना करू नका. राज्यस्तरावरून अशा योजनांना मंजुरी दिली जात नाही. या कारणाने संबंधित पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीस उशीर होतो. त्यामुळे गावांना याबाबत सविस्तर तांत्रिक बाजू समजावून सांगूनच सुधारीत योजनेत नवीन कामांचा समावेश करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह अध्यक्ष कार्तिकेयन एस., सदस्य सचिव कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मनिष पवार, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन माधुरी परिट यांच्यासह सर्व उपविभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, शाळा व अंगणवाडीमध्ये कुठेही पाण्याची कमतरता नको. सर्व शाळा अंगणवाड्यांमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करून टाक्या सुस्थितीत असल्याची खात्री करा. प्रत्येक नळ पाणीपुरवठा योजनेतील जलस्रोत हा भूजल विभागाकडून अंतिम केला असल्यास ग्रामपंचायतीला तो बदलता येणार नाही. संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन त्यांना तांत्रिक बाजू सांगून प्रलंबित योजना मार्गी लावा. प्रत्येक पाणीपुरवठा योजना ही तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि गुणवत्तापूर्वकच करा असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जल जीवन मधील प्रलंबित योजनांची कामे 25 टक्के पर्यंत सद्यस्थितीत आहेत त्या योजना पुढील एका महिन्यात 50 टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण करा. यातील प्रत्येक योजनानिहाय सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. यामध्ये वन विभागाकडील प्रलंबित प्रश्न, गायरान जमिनीबाबत, वीज जोडणीबाबत इ. विषयावर चर्चा करण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत 6 लाख 84 हजार 162 उद्दिष्टापैकी 6 लाख 81 हजार 441 नळजोडणीचे काम पूर्ण होऊन 99.62 टक्के काम झाले आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. प्रत्येक जलजीवन मिशन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजनांबाबत सादर केलेल्या योजना पूर्णत्वाच्या नियोजनानुसारच ते काम पूर्ण होईल याची खात्री करा. स्वच्छ भारत मिशन मधील घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर उर्वरित कामांना गती द्या. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून घनकचरा व्यवस्थापन हा विषय मार्गी लावा. याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक पाणीपुरवठा योजनेस तसेच घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व स्वच्छता मिशन अनुषंगिक कामांना भेटी देणार असल्याचे सांगितले.
संख्यात्मक आकडेवारी – जिल्ह्यात 1237 नळ पाणी पुरवठा असून यातील 1010 जल जीवन मिशन, 81 राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा, 13 सौर ऊर्जेवर अधारीत, 121 अंगणवाडी व शाळा आहेत. यातील जल जीवन मिशन अंतर्गत 537 योजना सुरु झाले आहेत, 0 ते 25 टक्के काम 19 योजना, 25 ते 50 टक्के काम 91 योजना, 50 ते 75 टक्के काम 206 योजना, 75 ते 99 टक्के काम 366 योजनांचे झाले आहे. 1010 पैकी 6 योजनांची कामे अद्याप सुरू नाहित. 100 दिवसांच्या कृती आराखड्यात जिल्ह्यात 2 हजार 8 जलस्त्रोत जीवोटॅग करण्यात आले आहेत. 1 हजार 837 योजनांचे माहिती फलकही जीवोटॅग झाले आहेत.