no images were found
एनजीओ कंपॅशन २४ आणि कोल्हापूर वुई केअर ह्यांच्या तर्फे “ येत्या २ आणि ३ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या उत्सव
कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगा कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात जंगलात संपूर्णतः नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यकारी, पौष्टिक व औषधी अशा या रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन निसर्गप्रेमींनी त्या आपल्या परसबागेत लावून त्यांना त्याचे फायदे मिळावेत ह्या दृष्टीने एनजीओ कंपॅशन २४ आणि कोल्हापूर वुई केअर ह्यांच्या तर्फे “महात्मा गांधी जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२” ह्यांचे औचित्य साधून जवळपास १०५ अश्या ह्या रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या २ आणि ३ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे माननीय संजयसिंग चौहान, मुख्य अधिकारी, जिल्हापरिषद ह्यांच्या हस्ते होणार असून माननीय डॉ. श्री. मधुकर बाचुळकर वैज्ञानिक आणि लेखक, माननीय संजय शिंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नागिरी, माननीय श्री. बाबासाहेब वाघमोडे प्रांताधिकारी गडहिंग्लज, माननीय श्री. उमेश पाटील विभागीय अध्यक्ष कृषी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.
शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू माननीय डॉ. डी. टी.शिर्के आणि इतर मान्यवर देखील ह्या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. मुरुडा, सकाळू (वृक्षांवर उगवणारा अळू), तीनतोंडी, मांजरी / उंदराचे कान, करशिंगी (चारफुटी शेंगा) पपनस (बंपर फळ) सफेद मुसळी अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच काटवलं, दिंडा, कुडा, आंबुशी पाथरी, कुरडू ,शेवगा, बांबू कोंब, आंबट चुका, चाकवत, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाट, घोळभाजी, अंबाडी सुरण, टाकळा, मटारू, भुई आवळा, कवठ, भारंगी ह्या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला ह्या प्रदर्शनात बघता येतील. लोकांना ह्या रानभाज्यांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून श्री. मोहन माने, कोल्हापूर यांच्या मूळ संकल्पनेतून रानभाज्यांचे हे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरू वापरुन जवळपास ७५ रोपे तयार करण्यात आली आहेत आणि रोपांच्या मार्फत ह्या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी ह्या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.
गार्डन क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे. ह्या प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी हे असून प्रदर्शना संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये. निसर्ग मित्र “ अनिल चौगुले, डॉ. अशोक वाली, सौ. भाग्यश्री कलघटगी, गार्डन क्लबच्या अध्यक्षा सौ.कल्पना सावंत आणि वृक्षप्रेमीचे अध्यक्ष अमोल बुढढे आणि सुशील रायगांधी उपस्थित होते.