
no images were found
लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळवा : भगवान कांबळे
कोल्हापूर : लोकगितांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाही, मताधिकार यात त्याचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील नागरिकांनी एकल किंवा समूह गटाने सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
स्पर्धा 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मतदार यादीत नाव नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे; पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबधी जागृती करता येईल.
पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगले शिक्षण, चांगली घरे, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकाना विनासायास प्राप्त होणे, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला नताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यासारख्या विचारांची गुंफण लोकगीतांतून करता येईल.
समूह आणि एकल गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक रकमांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये, द्वितीय क्रमांक अकरा हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये, द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. स्पर्धेची अधिक माहिती व नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/LokshahiJagar-Rules-2022.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.