
no images were found
पाणी येण्यापुर्वी नागरीकांनी स्थलांतरीत होण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेले चार दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील पूराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, मुक्त सैनिक वसाहत, सुतारवाडा या परिसराची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज पाहणी केली. त्याचबरोबर तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टी जवळील 58 व सुतारवाडा येथील 20 स्थलांतरीत केलेल्या नागरीकांच्या निवारा केंद्रासही त्यांनी भेट दिली.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने सर्वांनी दक्ष राहून काम करावे. ज्या ज्या भागात पूराचे पाणी टप्याटप्याने येते त्या भागातील नागरीकांना पाणी येण्यापुर्वी स्थलांतर करा. कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून धोकादायक इमारतींतील नागरीकांना स्थलांतरीत करा. यासाठी आवश्यकता वाटल्यास पोलिस बंदोबस्त घेण्याच्या सूचना सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी मुरम पॅचवर्कची कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिल्या. निवारा केंद्राच्या ठिकाणी लाईट, पाणी व टॉयलेटची चांगली व्यवस्था करा. रात्रीचे पूराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरीकांचे आजच निवारा केंद्रात स्थलांतर करा. मार्केट यार्ड कमिटी हॉल येथील 58 व चित्रदुर्ग मठ येथील 20 स्थलांतरीत नागरीकांना जेवणाची व्यवस्था महिला बचत गटामार्फत करा. यासाठी चारही विभागीय कार्यालयात स्वतंत्र महिला बचत गटांची नियुक्ती करण्याच्या सूचना पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील यांना दिल्या. शहरातील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन सक्शन पंपाद्वारे तीन दिवसात साफ करण्याच्या सूचना सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. तसेच पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असलेने पाणी येणाऱ्या नागरीकांनी निवारा केंद्रात स्थलांतरीत होण्याचे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील आदी उपस्थित होते.