
no images were found
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ’गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !
‘
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- काळ महिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे, तर ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया. असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या सनातन संस्थेच्या वतीने इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. याच समवेत सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज आणि निपाणी येथे, तसेच देशभरात एकूण 75 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील प्रत्येक गडदुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यातीलच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या ठिकाणीही विधर्मींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण निघण्यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आणि अखेर शासनाला हे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करावा लागला. या वेळी हिंदूंचा उद्रेक झाला ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी विधर्मीयांकडून हिंदु धर्म असुरक्षित करण्याचे काम चालू, असे असले तरी आध्यात्मिक शक्तीमुळे हिंदु धर्म सुरक्षित आहे. तरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण देव, देश, धर्म यांसाठी आपण सतत कार्यरत रहाण्याचा संकल्प करूया ! ’’
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते. या महोत्सवांत धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले. गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ सुद्धा दाखवण्यात आली.