
no images were found
पहिल्या पिढीतील उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठाचा पुढाकार
कोल्हापूर,(प्रतिनिधी ):-उद्योजिकतेचा कोणताही कौटुंबिक वारसा अथवा पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी आणि दिव्यांग व तृतीय पंथी, वंचित घटकातील व्यक्ती यांच्यामध्ये उद्योजिकतेची प्रेरणा निर्माण करणे आणि त्यातून त्यांनी उद्योजक बनावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व देअसरा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रथम पिढी उद्योजकता विकास’ कार्यक्रमाचे दिनांक २३ ते २६ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २३ जुलै रोजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी श्रीमती मनिषा तपस्वी व प्रा. अविनाश भाले मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ अधिविभाग, काही संलग्नित महाविद्यालये व इतर संस्था यांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यांच्या क्षमतांच्या आधारे पुढील प्रशिक्षणासाठी त्यांची निवड करणे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
नंतरच्या टप्प्यात प्रशिक्षणांतर्गत उद्योग व व्यवसायिकतेसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये वृधिंगत करणे, आवश्यक संसाधने व सुविधा, उद्योग व व्यवसायातील संधी, त्यासाठी होणारा पतपुरवठा, उपलब्ध बाजारपेठा, इत्यादींच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या निवडक विद्यार्थी व व्यक्तींची स्टार्टअपसाठी निवड केली जाणार आहे.देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, छत्रपती शहाजी महाविद्यालय, न्यू कॉलेज, कोल्हापूर, शिवराज कला व वाणिज्य आणि घाळी कॉलेज, गडहिंग्लज, राजर्षी शाहू महविद्यालय, रुकडी, हेल्पर्स ऑफ हैन्डीकॅप व मैयत्री संघटना, कोल्हापूर या महाविद्यालये व संस्थांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राचा हा अभिनव उपक्रम असून समाजातील वंचित विद्यार्थी, तृतीय पंथी व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. तरी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.