no images were found
आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रायथलॉन ड्यअथलॉन स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी 2 ऑक्टोंबर रोजी ट्रायथलॉन आणि ड्यअथलॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा कोल्हापुरात होणार आहेत. ही स्पर्धा रविवारी सकाळी 6 वाजता सुरू होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे अशा स्वरूपात ही स्पर्धा असणार आहे. राजाराम तलाव येथे दोन किलोमीटर पोहणे, राजाराम तलाव ते तवंदी घाट 90 किलोमीटर सायकलिंग आणि शिवाजी विद्यापीठ रोडवर 21 किलोमीटर धावणे अशी ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 750 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नोंदणी पूर्ण झाली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास कीट व रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेतील विजेत्यांना फिनिशर्स टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच 250 स्वयंसेवक या स्पर्धेसाठी सज्ज असून सुरक्षिततेसाठी डॉक्टर व अंबुलन्स यांची व्यवस्था आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब ही एक सामाजिक संस्था असून यामध्ये खेळाडू व आयर्नमॅन सहभागी आहेत. तसेच या स्पर्धेसाठी विलो आणि रग्गेडियन यांचे सहकार्य लाभले आहे. पत्रकार परिषदेस आकाश कोरगावकर, खुशबू तलरेजा, डॉ. विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.