no images were found
अन्यायकारक स्मार्ट मीटर सक्ती विरोधातील आम आदमी पार्टीच्या आक्रोश आंदोलन व उपोषणाची यशस्वी सांगता
अन्यायकारक स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षातर्फे गेले दोन महिने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात सातत्याने आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु त्याला राज्य विद्युत विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काल दिनांक 27 जून पासून आझाद मैदान मुंबई येथे आम आदमी पार्टी तर्फे प्रदेश प्रभारी गोपाल भाई ईटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके – पाटील यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन व उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. गेले दोन दिवस पावसाची तमा न बाळगता मोठ्या जोशपूर्ण वातावरणात हे आंदोलन सुरु होते. यावेळी आपचे राज्य संघटनमंत्री संदीप देसाई, राज्य सचिव डॉक्टर अभिजीत मोरे, राज्य संघटन सचिव संग्राम घाडगे, राज्य सहसचिव अविनाश देशमुख, राज्य सहसचिव सागर पाटील, पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे बेमुदत उपोषणास व अनेक पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले होते. या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे व विजय कुंभार, राज्य संघटनमंत्री भूषण ढाकूळकर, मनिष मोडक, नविंदर अहलुवालिया, डॉ रियाझ पठाण, राज्य सचिव विनय कोठारी व सोनू फटींग, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, राज्य युवा अध्यक्ष मयुर दौंडकर,राज्य सहसचिव श्यामभाऊ कदम व वसीम मुल्ला रुपेश कदम यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जिल्हा व महानगरपालिका पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागातर्फे आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये आश्वासन देण्यात आले की घरगुती वापराकरता स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही. आणि याबाबतची तशी सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर सगळीकडे जाहीर करण्यात आली आहे. जनतेच्या रोषापुढे राज्य सरकारला व महावितरणला मागे जावे लागले आहे. हा आम आदमी पार्टीचा विजय आहे. पण लढाई अजून संपलेली नाही. जर भविष्यात अडाणी सारख्या कंपन्यांचा फायदा करुन देण्यासाठी स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न झाला तर आम आदमी पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरले, असा इशारा महावितरणला व राज्य सरकारला देण्यात आला आहे. विद्युत महामंडळाच्या विनंतीला प्रतिसाद देत आम आदमी पार्टीच्या उपोषणकर्त्यांनी आज दुपारी बेमुदत उपोषण स्थगित केले.
“महावितरणने आत्ता माघार घेतली असली तरी लढाई अजून संपली नाही. येत्या काळात आम आदमी पार्टी सतर्क राहून महावितरण व ऊर्जा मंत्रालयाच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहे. दिल्ली व पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी आम आदमी पार्टी सातत्याने संघर्षशील राहील”, असे मत आपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके – पाटील यांनी यावेळी मांडले.