
no images were found
कलाकार सांगत आहेत, कोणाच्या प्रेरणेने त्यांच्या मनात अभिनयाविषयीची ओढ निर्माण झाली
प्रत्येक कलाकाराच्या मागे एक मार्गदर्शक प्रकाश असतो, जो त्यांना स्वप्न बघण्याची प्रेरणा देतो. सोनी सबच्या मालिकांमध्ये काम करत असलेल्या आपल्या लाडक्या कलाकारांसाठी अभिनय हा केवळ प्रसिद्धी आणि पैशाचा ध्यास नाही; तर त्यांना प्रेरित करणाऱ्या, शिकवणाऱ्या आणि घडवणाऱ्या आदर्श व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाकून केलेला प्रवास आहे! आपल्या मार्गदर्शकाला आदरांजली वाहताना सोनी सबचे कलाकार त्या व्यक्तीविषयी, आपल्या कलेवर दिसणाऱ्या त्या व्यक्तीच्या प्रभावाविषयी सांगत आहेत.
तेनाली रामा मालिकेत राजा कृष्णदेवरायाची भूमिका करणारा आदित्य रेडिज म्हणतो, “मी अभिनय निवडण्याअगोदर अभिनय कलेनेच माझी निवड केली होती. मला पहिल्यापासून कथाकथन करण्याची आवड होती, मंचावर किंवा कॅमेऱ्यासमोर. प्रत्येक वेळी नव्या व्यक्तिरेखेत शिरल्यावर मला जो आनंद मिळायचा, त्यामुळे माझा निर्णय ठाम होऊ लागला. शाहरुख खानचा प्रवास बघताना मला नेहमीच प्रेरणा मिळते. चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून तो आला आहे. त्याने खूप संघर्ष केला आणि निव्वळ आपल्या प्रतिभेच्या आणि परिश्रमाच्या बळावर आपले आगळे स्थान निर्माण केले. टेलिव्हिजनकडून चित्रपटांकडे झालेला त्याचा प्रवास या गोष्टीची साक्ष देतो की, तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्ही आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित ठेवले, तर स्वप्नं नक्की पूर्ण होतात. त्याला यशस्वी होताना पाहून आमच्यासारख्या बऱ्याच जणांना नवी आशा मिळाली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांनी प्रवास सुरू केला.”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी करुणा पांडे म्हणते, “अग्निपथ चित्रपटातील बच्चन साब अफलातून होते! त्यांच्या सगळ्याच चित्रपटांत ते अद्भुत असतात. तसेच दिलीप कुमार, अशोक कुमार आणि गुरु दत्त देखील आहेत. अनेक महान नेत्यांनी मला प्रेरित केले आहे. अभिनेत्रींबद्दल सांगायचे तर देश-विदेशातील अनेक अभिनेत्रींची मी चाहती आहे. हॉलीवूडमधील मेरील स्ट्रिप आणि जूलिया रॉबर्ट्स या मला खूपच आवडतात. हिंदी आणि मराठी सिनेमात वेगवेगळ्या चित्रपटात मला वेगवेगळ्या अभिनेत्री आवडल्या आहेत. प्रत्येक अभिनेत्यामध्ये काही तरी अनोखे असते, आणि वेगवेगळ्या भूमिका मला वेगवेगळ्या प्रकारे प्रेरित करतात.”
तेनाली रामा मालिकेत तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “माझे वडील आदित्य भारद्वाज हे माझे सगळ्यात मोठे प्रेरणास्रोत आहेत. ते माझे पिता तर आहेतच पण एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहेत. त्यांना मंचावर आणि पडद्यावर काम करताना पाहून, आपली जादू पसरताना पाहून माझ्या मनात अभिनयाविषयीची ओढ निर्माण झाली. कलेविषयी त्यांची जी निष्ठा होती, ती पाहूनच मी शिस्त, साधेपणा वगैरे बऱ्याच गोष्टी शिकलो. तेनाली रामा मालिकेत तेनालीची भूमिका मिळाली तेव्हा माझे स्वप्न साकार झाले. पण या स्वप्नाचे बीज त्यांनीच रोवले होते.”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत प्रार्थनाची भूमिका करणारी इंद्राक्षी कांजीलाल म्हणते, “70 आणि 80 च्या दशकातील बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी मला नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांच्या अभिनयात एक डौल आणि आवेग होता, जो अजून मला खूप भावतो. मला 2000 च्या काळातल्या चित्रपटातली प्रीती झिंटा देखील खूप आवडते. तिची ऊर्जा, मोहकता आणि भावपूर्ण अभिनय यांचा माझ्या मनावर सखोल प्रभाव पडला आहे. या कलाकारांनी माझी अभिनयाची समज घडवली आहे आणि आजही पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत प्रार्थनाची भूमिका करताना त्यांचा प्रभाव मला जाणवतो.”