no images were found
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई : दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. केंद्र सरकारकडून ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. ठाकुर यांनी आशा पारेख यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला. पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आला आहे. ७९ वर्षीय अभिनेत्री ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझील’ आणि ‘कारवां’ यासारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. त्यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली. पारेख यांनी १९९० साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’चं दिग्दर्शन केलं होतं. आशा पारेख यांचे लोकप्रिय आणि अजरामर सिनेमे ‘जब प्यार किसी से होता है’ (1961), ‘फिर वही दिल लाया हूं’ (1963), ‘तीसरी मंजिल’ (1966), ‘बहारों के सपने’ (1967), ‘प्यार का मौसम’ (1969), ‘कटी पतंग’ (1970) आणि कारवां (1971) आहेत.
आशा पारेख फक्त अभिनेत्री नाही, तर शास्त्रीय नृत्यांगनाही आहेत. त्यांनी बालपणापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली होती. वयाच्या १०व्या वर्षी माँ या सिनेमात काम केलं होतं. सुरुवातीला काही सिनेमात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. नंतर अभ्यासासाठी अभिनय थांबवला. आशा पारेख १६ वर्षांच्या होत्या तेव्हा गुंज उठी शहनाई सिनेमात त्यांना नायिका म्हणून काम हवं होतं. पण तुझ्यात स्टार मटेरियल नाही, म्हणून त्यांना ते नाकारलं गेलं होतं. नंतर नासिर हुसेन यांचा दिल देके देखो सिनेमा त्यांनी साइन केला. त्यांचे नायक होते शम्मी कपूर. सिनेमा हिट झाला. आशा पारेख एका रात्रीत स्टार झाल्या.
आशा पारेख आता सिनेमात काम करत नाहीत. मुंबईबाहेर त्यांची नृत्य अकादमी आहे. शिवाय सांताक्रूझ इथे आशा पारेख हाॅस्पिटलही आहे. त्या त्यातच लक्ष घालतात.